दारू दुकानासाठी मोखाळातील महिलांचा पुढाकार
By admin | Published: June 25, 2014 11:41 PM2014-06-25T23:41:20+5:302014-06-25T23:41:20+5:30
सावली तालुक्यातील चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील मोखाडा येथे सोमवारी झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत परवानधारक देशी दारू दुकान लावण्यासाठी महिलांनी ९५ टक्के प्रतिसाद दिला.
उपरी : सावली तालुक्यातील चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील मोखाडा येथे सोमवारी झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत परवानधारक देशी दारू दुकान लावण्यासाठी महिलांनी ९५ टक्के प्रतिसाद दिला. यामुळे येथे महिलांच्या पुढकारानेच, ग्रामसभेचा ठराव पारित करण्यात आला आहे.
मोखाळा ग्राम पंचायतकडे परवानाधारक चिल्लर देशी दारु दुकानदाराने दुकान सुरू करण्यासाठी अर्ज सादर केला. त्यानुसार ग्राम पंचायतने सोमवारी महिलांची ग्रामसभा आयोजित केली. या सभेला २३४ महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांमधूनच अध्यक्ष म्हणून वनिता विनोद भोयर यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रियंका मशाखत्री, पंचायत समिती सदस्य अनिता चुनारकर व इतर महिला, ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होत्या.
सदर सभेत अर्जाचे वाचन करुन उपस्थित महिलांना नकार व होकारासाठी हात वर करण्यास सूचना केली. यावेळी केवळ २८ महिलांनी दारु दुकानाला नकार दिला तर २०६ महिलांनी दारु दुकान सुरु करण्यासाठी होकार दिला. यावरुन महिलांनीच मोखाळा येथे दारु दुकानासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.
ग्रामपंचायतीच्या हद्दीत एक बार सुरु असून या मुख्य मार्गावरील पाच किंमी अंतरावर एक वाईन शॉप व चार बार व महाममार्गापासून दोन किमी अंतरावर केरोडा येथे देशी दारू दुकान आहे.त्यामुळे या परिसरात नवीन दारू दुकान हे काही नवे नाही अशी प्रतिक्रिया मोखाळा येथील महिलांची आहे. विशेष म्हणजे, या ठरावानंतर गावात उलट-सुलट चर्चेला उत आला आहे. (वार्ताहर)