कर सुसूत्रता व व्यापार सुलभतेसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:24 AM2021-02-15T04:24:52+5:302021-02-15T04:24:52+5:30
चंद्रपूर : ‘चांदा ते बांदा’ सर्वत्र व्यापार- उद्योगांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. यासाठी कर प्रणालीत सुसूत्रता व व्यापार सुलभतेसाठी ...
चंद्रपूर : ‘चांदा ते बांदा’ सर्वत्र व्यापार- उद्योगांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. यासाठी
कर प्रणालीत सुसूत्रता व व्यापार सुलभतेसाठी महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज
सरकारकडे पाठपुरावा करणार, अशी ग्वाही ललित गांधी यांनी दिली.
चंद्रपूर चेम्बर ऑफ कॉमर्स, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर व्यापारी असोसिएशनच्या संयुक्त आयोजनातील व्यापारी उद्योजक सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
यावेळी चंद्रपूर चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी.ए. हर्षवर्धन संघवी, चंद्रपूर एमआयडीसी इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रामजीवन परमार आदी उपस्थित होते. हर्षवर्धन संघवी यांनी जीएसटी करप्रणालीतील त्रुटींचे विस्ताराने विश्लेषण करून या त्रुटी तात्काळ दूर होण्याची गरज विशद केली. मधुसूदन रुंगठा यांनी उद्योगांना करप्रणालीतील अडचणींबरोबर, कच्च्या मालाचे वाढलेले दर, इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च, तसेच दुहेरी कराची आकारणी यामुळे उद्योग चालविणे कठीण असल्याचे सांगितले. रामजीवन परमार यांनी फूड सेफ्टी अॅक्टमधील अन्यायकारक तरतुदी दुरुस्त व्हाव्यात, अशी मागणी केली. याप्रसंगी विविध संस्था व मान्यवरांनी ललित गांधी यांचा सत्कार केला. खुल्या सत्रात विचारलेल्या प्रश्नांना ललित गांधी यांनी उत्तरे दिली. न्याय्य मागण्या व विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी व्यापारी उद्योजकांनी राज्याची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन गांधी यांनी केले.