जिल्ह्यातील या इन्फ्लुएन्सरचे फॉलोअर्स अन् कमाई आहे लाखांत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 01:30 PM2024-08-28T13:30:14+5:302024-08-28T13:31:50+5:30
सोशल मीडियातील स्टार : जिल्ह्यातच नव्हे तर देशात मिळाली ओळख
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : 'रोल कॅमेरा अँड अॅक्शन' म्हटले तर फक्त चित्रपटांपुरतेच आता मर्यादित राहिलेले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक जण आता स्टार झाले आहेत. त्यातूनच महिन्याकाठी हजारोंची कमाईदेखील केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही असे इन्फ्लूएन्सर असून, त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंत आणि उत्पन्न चाळीस ते पन्नास हजारांवर असल्याचे दिसून येत आहे.
सोशल मीडियावर विनोदी रील्स तयार करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील आशिष बोबडे, तर गावरान भाषेत मनोरंजन करणारे चंद्रपूर तालुक्यातील नागाळा येथील प्रतीक वाढई यांची ओळख आता सातासमुद्रापार गेली आहे. यासह अनेक इन्फ्लूएन्सर्स सोशल मीडियावर मनोरंजक माहितीपूर्ण आणि प्रभावी कंटेंट शेअर करून फॉलोअर्सची मने जिंकत आहेत. यातून त्यांना महिन्याकाठी बरेच उत्पन्नही मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे इन्फ्लूएन्सर आपले फॉलोअर्स वाढविण्यासाठी दररोज नवनवे प्रकार रील्स, व्हिडीओ बनवून शेअर करत असल्याचे दिसून येत आहेत.
पोट धरून हसायला लावणारा आशिष बोबडे
आशिष बोबडे हा मूळचा चिमूर येथील रहिवासी आहे. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्रम्प तात्यापासून तयार केलेला व्हिडीओ प्रेक्षकांनी उचलून धरला. तेव्हापासून तो सोशल मीडिया स्टार बनला आहे. महिन्याकाठी तो ६० ते ८० हजार रुपये कमवत आहे.
आशिष बोबडे फॉलोवर्स
इंस्टाग्राम - २,०१,८००
युट्युब - ४,०३,०००
फेसबुक - ४,०२,१८०
गावपण दाखवणारा प्रतीक वाढई
प्रतीक वाढई हा चंद्रपूर तालुक्यातील नागाळा येथील आहे. गावरान भाषेत तो विविध विषयावर व्हिडीओ बनवत असतो. साडी घालून बनविलेले व्हिडीओ हे प्रेक्षकांना चांगलेच पसंत पडत आहेत. यातून त्याला महिन्याकाठी ४० ते ५० हजारांचे उत्पन्न मिळत आहे.
प्रतीक वाढई फॉलोवर्स
इंस्टाग्राम - २,८९,०००
युट्युब - २६,०००
फेसबुक - १८,०००
हौशी कलावंतांना मिळाला वाव
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला प्रदर्शित करण्याची संधी हौशी कलावंतांना मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक कलावंत आपापल्या पद्धतीने रील्स अन् व्हिडीओ तयार करत आहेत.
नवीन इन्फ्लूएन्सरना सल्ला
"बालगोपालांपासून तरुणही सोशल मीडियाच्या मायाजाळात गुरफटत आहेत; परंतु पहिले विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करावे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा. ज्या विषयात आवड आहे. त्यासंदर्भात व्हिडीओ तयार करू शकतात; मात्र कुणाच्या भावना दुखावतील किंवा बदनामी होईल, असे व्हिडीओ तयार करू नये."
-आशिष बोबडे, चिमूर
"आपल्याला जी गोष्ट आवडते. ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, लोक काय म्हणतील याचा विचार करु नका. आपल्याला जे साध्य करायचे आहे. त्यासाठी कठोर परिश्रम करा."
-प्रतीक वाढई, नागाळा