११० एकर शेतात फुलविले नंदनवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:48 PM2017-12-25T23:48:55+5:302017-12-25T23:49:07+5:30
सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे.
रवी जवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे. तूर या पिकालाच मुख्य पीक समजून त्याची विक्रमी लागवड करीत लाखोंचे उत्पन्न घेत त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्शच ठेवला.
मधुकर भलमे हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथील ते रहिवासी आहेत. त्यांच्याकडे केवळ तीन एकर शेती आहे. त्यांनी दहा ते बारा वर्षांपूर्वी शेतात फळझाडांची व इतर पडित जागेवर विविध वृक्षांची लागवड करून उत्पन्न वाढविले होते. त्यानंतर त्यांचे शेतात नवीन प्रयोग करण्याचे धाडस वाढत गेले. हेक्टरी ३६ क्विंटल सोयाबीन पिकवून त्यांनी कृषी विभागाचेही लक्ष वेधले. त्यांनी नवनवीन प्रयोग करून यशस्वीही करून दाखविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शासनाने यापूर्वीच कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.
एरवी इतर मुख्य पीक शेतात लावल्यानंतर पाळीवर किंवा बांधावर तुरीची लागवड करण्याची सर्वसाधारण पद्धत आहे. मात्र मधुकर भलमे यांनी तुरीचेच मुख्य पीक म्हणून लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रारंभी त्यांनी १० एकर शेती भाडेतत्वावर घेतली. त्यात त्यांनी तुरीचे भरघोष उत्पन्न घेतले. त्यानंतर त्यांनी ३० एकर, आणि आता ११० एकर शेती भाडेतत्वावर त्यांनी घेतली. त्यात केवळ तुरीचीच लागवड केली आहे. ११० एकर शेतातून ६०० ते ७०० क्विंटल तुरीचे उत्पादन होणार, अशी आशा भलमे यांना आहे.
कृषी भूषण पुरस्कार
मधुकर भलमे यांनी २००५ मध्ये केंद्र शासनाच्या पीक स्पर्धेत भाग घेतला होता. यात त्यांनी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेऊन दाखविले होते. तेव्हा त्यांनी स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला होता. यासोबतच त्यांच्या यशस्वी प्रयोगाची दखल घेत २००८ मध्ये कृषी भूषण पुरस्कारही मिळाला.
आपल्याकडे कोरडवाहू शेती अधिक आहे. उत्पन्न होत नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड असते. मात्र आंतर पिकांवर अधिक जोर दिला तर नुकसान भरून काढता येते. मी तूर पीक लावले आहे. ७०० ते ७५० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. शेतकºयांनी ओरड करण्यापेक्षा शेतात नवनवीन प्रयोग करावे.
- मधुकर भलमे, शेतकरी चारगाव (बु.)