ग्रामीण रुग्णालयात वयाच्या दाखल्यासाठी पायपीट
By admin | Published: April 17, 2017 12:44 AM2017-04-17T00:44:27+5:302017-04-17T00:44:27+5:30
राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग विधवा, गरीब वृद्ध, अपंग, गंभीर आजारग्रस्तांना सन्मानाने जीवन जगता यावे ...
अधीक्षकाचा गलथान कारभार: निराधार वृद्धांची मोठी गैरसोय
बल्लारपूर : राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग विधवा, गरीब वृद्ध, अपंग, गंभीर आजारग्रस्तांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून संजय गांधी निराधार योजना राबवित आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालयातून देण्यात येतो. परंतु येथील अधीक्षकांनी मनमर्जी धोरण ठरवून आठवड्यातून एकाच दिवशी दाखला देण्याचे फर्मान सोडल्याने वयाच्या दाखल्यासाठी लाभार्थ्यांची पायपीट होत आहे.
परिणामी निराधारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधीक्षकांच्या गलथान कारभारामुळे त्यांची येथून बदली करण्याची मागणी दिव्यांग कल्याण समितीचे जिल्हा सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी केली आहे.
गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी व शासनाकडून दिलासा मिळावा म्हणून सामाजिक न्याय विभाग लोकाभिमूख योजना राबवले. या योजनेच्या माध्यमातून संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ, राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना राबवून आर्थिक अनुदान देत आहे. यासाठी वयाचे प्रमाणपत्र जोडण्याची अट आहे. यावर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक अधिकारी स्तरावरील स्वाक्षरी ग्राह्य धरली जात असून वयाचा दाखला आवश्यक बाब आहे. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांनी अशा दाखल्यासाठी स्वमर्जीने गुरुवारचा दिवस निश्चित केल्याने लाभार्थ्यांची अडचण वाढली आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दररोज दाखला देण्याचे क्रमप्राप्त असताना जाणीवपूर्वक गरजूना मानसिक व शारिरीक त्रास देण्याचे धोरण अवलंबिले असल्याचा आरोप श्रीनिवास सुंचूवार यांनी केला आहे. या संदर्भात सुंचूवार यांनी येथील वृद्धांची व निराधारांची ससेहोलपट थांबवावी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे निवेदन सादर करुन उपाय योजना करण्याची विनंती केली आहे.
शासनस्तरावर गरिबांच्या उत्थानासाठी चांगल्या योजना कार्यान्वित केल्या जातात. मात्र अधिकारी वर्गाकडून लोकाभिमूख योजना बासनात गुंडाळण्याचे काम करतात. परिणामी लाभार्थ्यांना योजनाचा लाभ मिळत नाही. गरिबांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजनेची अंमलबजावणी योग्य रितीने होण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा शल्य चिकित्सक करणार
दररोज दाखला देण्याची सोय
दिव्यांग कल्याण समितीचे जिल्हा सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना येथील समस्येचे निवेदन सादर केले. निराधारांना व वृद्धांना दररोज दाखला ग्रामीण रुग्णालयातून मिळावा म्हणून आग्रह केला. यावर डॉ. मुरंबीकर यांना कोणत्याही लाभार्थ्यांला वयाचा दाखला प्राप्त करण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही. दररोज वयाचा दाखला देण्याचा आदेश त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांना निर्गमित केला. मात्र येथील अधीक्षकांनी अद्यापही दररोज वयाचा दाखला देण्याचे मनावर घेतले नाही, असे ग्रामीण भागाच्या लाभार्थ्यांनी सांगितले.