‘त्या’ चार गावांच्या सीमेवर ४०० वर्षांपासून गायगोधन अन् ढालपूजा !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 10:49 AM2023-11-11T10:49:33+5:302023-11-11T10:50:21+5:30
गोवारी समाजाचा सांस्कृतिक वारसा : ११ गावांतील गोवारी बांधव येतात एकत्र
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील घोडपेठनजीक निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी आदी चार गावांच्या सीमेवर तब्बल ११ गावांतील आदिवासी गोंड-गोवारी समाज बांधवांकडून सुमारे ४०० वर्षांपासून बलिप्रतिपदेला नाविन्यपूर्ण गायगोधन व ढाल पूजा केली जाते. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पूजेसाठी उत्साहाने एकत्र येण्याची परंपरा यंदाच्या दिवाळीला कायम राहणार आहे.
चपराळा, चालबर्डी, घोट, निंबाळा, हेटी, लोणारा (गोंड), लोणारा (पारखी), कचराळा, मानोरा, मोहबाळा अशा ११ गावांमधील गोपाल (गायी राखणारा) आपल्या गायी गायगोधन पूजेसाठी याठिकाणी घेऊन येतात. सुमारे ४०० वर्षांपेक्षाही जुनी व सांस्कृतिक वारसा लाभलेली परंपरा आजही त्याच भक्तिभावाने सुरू आहे. भद्रावती तालुक्यातील निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी ही गावे घोडपेठपासून उत्तरेस चार किमी अंतरावर आहेत. या गावांत बहुतांश गोंड - गोवारी जमातीचे लोक राहतात. गायी राखणे हा पारंपरिक व्यवसाय असल्याने ही मंडळी गायींची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात.
...अशी होते पारंपरिक ढालपूजा
बलिप्रतिपदेला सकाळी गायगोधन व ढाल पूजा उत्सव होतो. त्यानंतर पूजेसाठी गायींना पटांगणावर आणतात. या पटांगणावर २५-३० टोपले शेणापासून एक मोठी भुरशी बनवतात. या भुरशीत एक अंडी व कोंबडीचे लहान जिवंत पिल्लू ठेवण्यात येते. पिलाचे धड शेणात दाबलेले असते व मानेचा भाग खुला ठेवला जातो. अंदाजे एक फुटाच्या ११ काड्यांची अंडी व पिल्लाच्या सभोवती कुंपण केले जाते. या काड्या पाच प्रकारच्या झाडांच्या असतात.
सहकुटुंब आनंदाला उधाण
ढालीला गुलाबी रंगाची रिबीन गुंडाळून सुवासिनी ओटी भरतात. गोवारींचे दैवत असलेल्या ढालीचे पूजन करतात. यात एक ढाल ही चार मुखी माता रायताड जंगोचे प्रतीक अर्थात स्त्री रूपाची असते. दुसरी ढाल ही दोन मुखी म्हणजे धर्मगुरू पहांदी पारीकुपार लिंगोचे प्रतीक अर्थात पुरूष रुपाची असते. दोन्ही ढालींची पूजा करून आखरावर जिथे गायगोधन तयार करून खिल्ला मुठवा पेनपूजा करतात. ढालपूजेत सहकुटुंब सहभागी होत असल्याने आनंदाला जणू उधाण येते.
परंपरेमागील श्रद्धा
पूजा करताना गायगोधनात कोंबडीचे पिल्लू व अंडी ठेवतात. त्यावर गायी खेळवतात. गायी खेळवताना अंडी व पिलांना इजा झाली नाही व दोन्ही सुरक्षित राहिले तर गायगोधन सुरक्षित आहे. वन्यप्राण्यांपासून गुरांना त्रास होऊ नये, गुरे रानात हरवू नयेत, त्यांचे रक्षण व्हावे व संकट येऊ नये, अशी गोधन व ढालपूजेमागील आदिवासी गोवारी समाजाची श्रद्धा आहे.