नऊ वर्षांपासून 'त्या' गावाला ग्रामपंचायतच नाही; कसा होणार गावाचा विकास ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:46 PM2024-07-26T12:46:27+5:302024-07-26T12:47:25+5:30
कसा होणार विकास? : कथा सरडपार गावची, व्यथा ग्रामपंचायतीची !
राजकुमार चुनारकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : देशाच्या विकासाची सुरुवात गावखेड्यापासून होते. यासाठी ग्रामपंचायत पंचायतराज व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. ग्रामीण जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या योजना ग्रामपंचायतमार्फत नागरिकांना पुरविण्यात येतात तर गावातील तंटे, जन्ममृत्यू नोंदी, आरोग्य, शिक्षण या सुविधा ग्रामपंचायतमार्फत नागरिकांना दिल्या जातात. मात्र चिमूर तालुक्यातील सातशे लोकसंख्या असलेल्या सरडपार गावात मागील नऊ वर्षांपासून ग्रामपंचायतच नाही.
त्यामुळे गावातील नागरिक ग्रामपंचायतसाठी नऊ वर्षांपासून शासन दरबारी पायपीट करीत आहेत. मात्र या बिना ग्रामपंचायतच्या गावाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधीचेही कमालीचे दुर्लक्ष केले आहे.
सरडपार गाव १९६२ ते २०१५ पर्यंत सरडपार गावची एक गटग्रामपंचायत होती. परंतु २०१५ मध्ये चिमूर नगर परिषद नवीन झाल्याने सरडपार गट ग्रामपंचायतमधील दोन गावे चिमूर नगर परिषदमध्ये समाविष्ट करण्यात आले व सरडपार गावाचे जास्त अंतर पडल्याने वाऱ्यावर सोडून दिले. २०१५ मध्ये सरडपार गाव जवळच्या ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट केले असते तर सरडपार गावाला नऊ वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून वंचित राहावे लागले नसते.
या संदर्भात गट विकास अधिकारी चिमूर, तहसील कार्यालय चिमूर, जिल्हा अधिकारी चंद्रपूर, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले असून मेलद्वारेसुद्धा कळविण्यात आले. तरी या गावाची दखल २०१५ पासून कोणी घेतली नाही. याचा त्रास सरडपार गाववासीयांना होत आहे. तसेच शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्रे कार्यालय नसल्याने उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक योजनांपासून गावकरी वंचित झाले आहेत
गाव विकासापासून वंचित
सरडपार येथे ग्रामपंचायतच नसल्याने हे गाव अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. कारण विकास करण्यासाठी ग्रामपंचायतसारखे कुठले प्रशासनच नसल्याने नाले, रस्ते, स्वच्छता या सगळ्यांचे तीन तेरा वाजले आहेत. येथील नागरिक शासकीय योजनांपासून वंचित आहे. मुलांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो आहे. दाखला मिळण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. येथील नागरिक गेल्या नऊ वर्षांपासून टाहो फोडत आहे. मात्र शासन दरबारी त्यांचा आवाज अद्यापही पोहोचलेला नाही.