मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्यांदाच नेतृत्व करणार तृतीयपंथी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:06 AM2023-02-21T11:06:17+5:302023-02-21T11:07:03+5:30
राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत निधी प्रथम
चंद्रपूर : हिमाचल प्रदेशात एप्रिलमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चंद्रपूरची तृतीयपंथी निधी चौधरी पहिल्यांदाच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. यवतमाळ येथे महाराष्ट्र युवा खेल परिषदेच्यावतीने पार पडलेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटातून चंद्रपूरचे नेतृत्व करीत निधी चौधरी हिने प्रथम क्रमांक पटकावला. ती आता राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. राष्ट्रीय स्तरावर १,५०० मीटर मॅरेथॉन स्पर्धेत धावणारी निधी ही पहिली तृतीयपंथी ठरणार आहे.
ती चंद्रपूर येथे जिल्हा परिषदेत कंत्राटी कर्मचारी आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने चंद्रपुरात क्रीडा स्पर्धांमध्ये निधीने आपली वेगळी छाप सोडली. लांब उडी स्पर्धेत ती द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. ८०० मीटर हर्बल रेसमध्ये प्रथम क्रमांक पटकावला, तर १,५०० मीटर रनिंगमध्ये ती प्रथम आली. यानंतर तिची यवतमाळ येथे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तिथेही निधीने महिला गटातून नेतृत्व करीत प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र युवा खेल परिषदेकडून तिचा सत्कार करण्यात आला. आता ती हिमाचल प्रदेशात एप्रिलमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.