ताडोबाच्या बफर क्षेत्रात गाणे वाजवणे पर्यटकांना पडले महागात; वनविभागाची कडक कारवाई
By राजेश भोजेकर | Published: January 27, 2023 12:21 PM2023-01-27T12:21:29+5:302023-01-27T12:27:07+5:30
ज्या परिसरात भरदिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो. अशा या संवेदनशील परिसरात गाडी खाली उतरून गाणे लावून पार्टी सुरू होती.
चंद्रपूर : ताडोबाच्या बफर क्षेत्रात रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून गाणे वाजवून पार्टी करणे परराज्यातील पर्यटकांना चांगलेच महागात पडले. या घटनेत वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर) संतोष थिपे यांनी अन्य राज्यातून आलेल्या वाहन चालकांकडून ५००० रुपये दंड वसूल करून लगेच जंगलाबाहेरचा रस्ता दाखविला.
जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली पद्मापुर मार्गाने जात असताना परराज्यातील पर्यटकांच्या दोन चारचाकी गाड्या ताडोबा बफर सफारीच्या रस्त्याखाली उतरून मोठ्याने गाणे लावून पार्टी करत असल्याचे तेथिल स्थानिक गाईड व ड्राइवरच्या लक्षात आले. त्यांनी मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालयास माहिती दिली.
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. ज्या परिसरात भरदिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो. अशा या संवेदनशील परिसरात गाडी खाली उतरून गाणे लावून पार्टी सुरू होती. याप्रकरणी ५ हजार रुपये दंड आकारून त्या पर्यटकांना जंगलाबाहेर काढले.