रानात चराई बंदी, गुरांचे पोट भरण्यासाठी चंद्रपुरात मुरघास उपक्रम
By साईनाथ कुचनकार | Published: April 28, 2023 02:55 PM2023-04-28T14:55:56+5:302023-04-28T14:56:30+5:30
चाराटंचाईवर होणार मात
चंद्रपूर : जनावरांना आता रानात चराई बंदी आहे. त्यामुळे जनावरांना घरच्या घरी चारापाणी द्यावे लागते. त्यामुळे पौष्टिक चारा मिळणे कठीण झाले आहे. परिणामी दुग्ध उत्पादनावरही परिणाम होत आहे. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसावी लागत असल्याने दिवसेंदिवस संख्या कमी होत आहे. त्यामुळे आता कृषी विभागाने जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मक्यापासून मुरघास चारा बनविण्याच्या उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे चाराटंचाईवर मात करता येणार आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनात अजयपूर येथील विठ्ठल परसूटकर यांनी आपल्या शेतावर बाजरी लावली. यातून दोन टन मुरघास विशेष प्रशिक्षकाकडून तयार करून घेतले. या उपक्रमाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अजयपूर येथे भेट देऊन प्रात्यक्षिक बघितले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरवळकर उपस्थित होते.
मुरघास चारा दुधाळू जनावरांसाठी वरदान आहे. विशेषत: मक्यापासून बनविलेला मुरघास जनावरे मोठ्या चवीने खातात. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात निश्चित वाढ होते. मुरघास सहा रुपये किलो दराने विकल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. मुरघास दिल्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होईलच, तसेच शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होईल, त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनासोबतच जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, कृषी पर्यवेक्षक बुगेवार व गावातील दूध उत्पादन करणारे शेतकरी उपस्थित होते.