वन कर्मचाऱ्यास मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल
By admin | Published: January 8, 2016 01:53 AM2016-01-08T01:53:23+5:302016-01-08T01:53:23+5:30
विरुर वनपरिक्षेत्रातील सुब्बई बिटाचे वनरक्षक सिद्धार्थ रेसमा कांबळे हे नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १३२ मधून जंगल गस्त करुन रोजदारी मजुरासह परत येत असताना ...
कठोर कारवाई करा : वनरक्षक संघटनेची मागणी
राजुरा : विरुर वनपरिक्षेत्रातील सुब्बई बिटाचे वनरक्षक सिद्धार्थ रेसमा कांबळे हे नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १३२ मधून जंगल गस्त करुन रोजदारी मजुरासह परत येत असताना सायंकाळी थोमापूर गावात पोहोचताच तेथील प्रकाश श्रीराम भुक्या यांनी अडवून मारहाण केली. याबाबतची तक्रार विरुर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून तक्रारीवरून पोलिसांनी भुक्या याच्यावर अदखपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ही घटना मंगळवारी घडली.
महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना नागपूरने घटनेचा निषेध नोंदविला असून केंद्रीय संघटक राजेश पिंपळकर यांनी शासकीय कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे. वनरक्षक कांबळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन विरुर येथे आरोपी प्रकाश श्रीराम भुक्या यावर भादंवि ३२४, ५०४, ५०६ व ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यापूर्वीही कार्यरत वनरक्षक अहेमद मस्तान यांना मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विरुर वनपरिक्षेत्रातील सुब्बई बिट अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त व अतिदुर्गम परिसरात आहे. या परिसरात आंध्रप्रदेशातील सागवान तस्करांकडून अवैध तोडीचा प्रकार घडत आहेत. त्यामुळे या परिसरातील वन कर्मचारी दहशतीत वनाचे रक्षण करीत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या इसमावर भादंवी ३५३ व ३३३ नोंद करुन मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी वनरक्षक वनपाल संघटनेचे राजेश पिंपळकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावर कोणती कारवाई करतात याकडे संघटनेचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)