वने ही धनापेक्षाही मौल्यवान; रामबाग वनवसाहतीमध्ये रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 02:34 PM2023-09-13T14:34:34+5:302023-09-13T14:34:50+5:30

‘वनविभागात आमूलाग्र बदल होत आहे. कार्यालये, विश्रामगृह अतिशय दर्जेदार करण्यात आली आहे.

Forests are more valuable than wealth; Bhoomipujan for construction of roads and drains in Rambagh Forest Colony | वने ही धनापेक्षाही मौल्यवान; रामबाग वनवसाहतीमध्ये रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन

वने ही धनापेक्षाही मौल्यवान; रामबाग वनवसाहतीमध्ये रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन

googlenewsNext

चंद्रपूर: वन विभाग हा मनुष्याला प्राणवायू देणारा विभाग आहे. प्राणवायू आपण विकत घेऊ शकत नाही. त्यामुळेच वन हे धनापेक्षाही मौल्यवान आहे, असे विचार राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. त्याचवेळी चंद्रपूर आणि गडचिरोली या वनसंपन्न जिल्ह्यांमध्ये शुध्द पर्यावरणासोबत शुद्ध विचार आणि शुद्ध कृतीचे अधिष्ठान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

रामबाग वनवसाहतीमधील अंतर्गत रस्ते, नाली व इतर बांधकामांचे भूमिपूजन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वाघांच्या संरक्षणात आणि संवर्धनात महाराष्ट्राचा वनविभाग देशात पहिल्या क्रमांकावर आहे, असे सांगून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘१९७२ पासून वाघांच्या संरक्षणाची सुरवात झाली. संपूर्ण देशात महाराष्ट्रातच वाघांची संख्या वेगाने वाढते आहे. तसेच सहा सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांपैकी तीन व्याघ्र प्रकल्प आपल्या राज्यातील आहेत. त्यात चंद्रपूरच्या ताडोबा प्रकल्पाचा सुद्धा समावेश आहे, ही वनविभागासाठी अभिमानाची बाब आहे.’ वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचेही त्यांनी कौतुक केले.

‘वनविभागात आमूलाग्र बदल होत आहे. कार्यालये, विश्रामगृह अतिशय दर्जेदार करण्यात आली आहे. चंद्रपुरातील वन अकादमीची वास्तू तर हेवा वाटावी अशी आहे. चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. गेल्या काळात राज्यात ३३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. यातून महाराष्ट्रात २५५० चौ. कि.मी. वनक्षेत्र वाढले असून मँग्रोजच्या क्षेत्रात १०४ चौ. कि.मी.ने वाढ झाली आहे. यामागे वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचा मोठा वाटा आहे,’ असे मुनगंटीवार म्हणाले.  

वनशहीदांच्या कुटुंबाला निधी व नोकरी

वनांच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झाल्यास १० वर्षांपूर्वी केवळ २ लक्ष रुपये सानुग्रह अनुदान मिळत होते. मात्र अनुदानाची ही रक्कम वाढवून २५ लक्ष रुपये करण्यात आली आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांना प्राधान्यक्रमाने नोकरी उपलब्ध करून देण्यात येते. परभणीत जंगलातील वनव्यामध्ये जीव  गमाविणाऱ्या कुटुंबातील सदस्याला या विभागाचा प्रमुख म्हणून केवळ तीन दिवसात नोकरी उपलब्ध करून दिली. शहीद कुटुंबातील मुलगा / मुलगी अल्पवयीन असेल तर मृत व्यक्तिला जे लाभ निवृत्तीपर्यंत मिळणार होते, तसेच गृहीत धरून निवृत्तीपर्यंतचे सर्व लाभ कुटुंबियांना देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. 

वनांच्या संरक्षणाचा निर्धार

राजस्थानमध्ये बिष्णोई समाजाच्या पर्यावरणप्रेमी, वनप्रेमी नागरिकांनी तत्कालीन राजाच्या विरुध्द उठाव करून वनांच्या संरक्षणासाठी झाडांना आलिंगन देत आंदोलन केले होते. या झाडांची तसेच आंदोलकांची राजाने अतिशय निर्दयीपणे कत्तल केली. तेव्हापासून ११ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन शहीद दिन म्हणून पाळला जातो. या शहिदांच्या संकल्पनेतील वनांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या कृतीतून आणि आचरणातून नागरिकांनी समोर यावे, असे आवाहन वनमंत्र्यांनी केले. वाघाच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे आणि हत्तीच्या पायाखाली चिरडलेले महुत जानकीराम मसराम यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. 

वन विभाग एक कुटुंब

वसुंधरेच्या रक्षणासाठी वन विभागातील अधिकारी – कर्मचारी कार्यरत आहे. हा केवळ एक शासकीय विभाग नाही, तर एक कुटुंब आहे आणि कुटुंबप्रमुख म्हणून पूर्ण शक्तीने आपण पाठीशी उभे आहोत. वनांपासून लोकांच्या मनापर्यंत इश्वरीय भावनेतून अधिकारी व कर्मचा-यांनी काम करावे. कोणत्याही परिस्थितीत वन विभागाचे नाव बदनाम होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. 

गवताची नर्सरी आणि टिश्यू कल्चर लॅब

आपल्या जिल्ह्यातील लाकडाचा उपयोग अयोध्येतील राममंदीर आणि नवीन संसद भवनाच्या प्रवेशद्वारांकरिता करण्यात आला आहे. जिल्ह्यात आता २५ प्रकारांपेक्षा जास्त गवताची नर्सरी तसेच टिश्यू कल्चर लॅब उभारण्यात येणार आहे. सोबतच कॅम्पामधून निवासी वसाहतींकरीता १०० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

कामाच्या गुणवत्तेवर जनतेने लक्ष ठेवावे

रामबाग वनवसाहतीतील नागरिकांच्या मागणीनूसार येथील अंतर्गत रस्ते, नाली व इतर विकासकामांसाठी २ कोटी ४१ लक्ष ८७ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक काम होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी या कामावर लक्ष ठेवावे. लोकांच्या सोयीसाठी हे काम होणार असल्यामुळे याकडे गांभिर्याने लक्ष द्या, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Web Title: Forests are more valuable than wealth; Bhoomipujan for construction of roads and drains in Rambagh Forest Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.