पर्यावरण संतुलनासाठी जंगल वाचविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:26 AM2021-02-12T04:26:12+5:302021-02-12T04:26:12+5:30
अभिनेत्री प्रिया मराठे : ताडोबा सफारीदरम्यान ‘लोकमत’शी बातचीत राजकुमार चुनारकर चिमूर : ...
अभिनेत्री प्रिया मराठे : ताडोबा सफारीदरम्यान ‘लोकमत’शी बातचीत
राजकुमार चुनारकर
चिमूर : देशातील वाढती लोकसंख्या व दिवसागणिक वाढणारे औद्योगिकीकरण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मानवावर अनेक संकटे येत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. यासाठी चंद्रपूर, गडचिरोलीचे जंगल व तेथील वाघ वाचविणे गरजेचे आहे, असे मत "पवित्र रिश्ता" टीव्ही मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री प्रिया मराठे यांनी व्यक्त केले.
मंगळवार व बुधवार असे दोन दिवस ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी नवेगाव गेट येथे मराठी चित्रपट अभिनेते पती शंतनू मोघेसोबत त्या आल्या असता ‘लोकमत’शी बोलत होत्या. ‘या सुखानो या’, ‘चार दिवस सासूचे’ व ‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही मालिकेतील वर्षाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठे पुढे म्हणाल्या, ताडोबातील वाघामुळे या क्षेत्रात टुरिझमला चांगले भविष्य आहे. कारण यामुळे या परिसरात स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आम्ही सिमेंटच्या जंगलात वास्तव्यास असतो. त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य बघायला मिळत नाही. त्यामुळे वाघासोबत जंगल व इतर बाबींचा आनंद लुटण्यासाठी आले आहे. दोन दिवसांच्या सफारीमध्ये पंढरपोवनी परिसरात "टी १२" माया वाघिणीचे बछडे व एक बिबट्या यासह अनेक जंगली प्राणी बघायला मिळाले. त्यामुळे आनंदित असल्याचे सांगितले. ताडोबातील वाघाचे आकर्षण देशभरात आहे. आम्हालाही आहे. त्यामुळे आम्ही ताडोबात आणखी येऊ, असेही प्रिया मराठे व पती शंतनू मोघे म्हणाले.
बॉक्स
चहासाठी गाठले "नवेगाव"
नवेगाव गेटमधून दुपारी सफारी केल्यानंतर प्रिया मराठे व पती शंतनू मोघे यांना चहा पिण्याची आवड झाली. त्यासाठी नवेगाव येथील गाईड रामराव नेवारे यांच्या घरी जाऊन चहा पिऊन गावखेड्यातील जीवनाचा अनुभव घेतला.