जबरान जोतधारकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:22 PM2018-11-05T22:22:17+5:302018-11-05T22:23:08+5:30
शेतमजूर व जबरान जोतधारकांना सामाजिक न्यायानुसार विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हुतात्मा स्मारकापासून मोर्चाची सुरूवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : शेतमजूर व जबरान जोतधारकांना सामाजिक न्यायानुसार विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हुतात्मा स्मारकापासून मोर्चाची सुरूवात झाली. संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांनीही मोर्चात सहभागी होवून सरकारविरूध्द घोषणाबाजी केली.
ब्रह्मपुरी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये जबरान जोतधारकांची संख्या हजारोंचा घरात आहे. हक्काची जमीन नसल्याने कुटुंब कसे जगवावे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. भारतीय संविधानाने सामाजिक न्यायाची तरतूद केली. याला अनुसरून शासनाने अनेक कायदे केले. परंतु हे कायदे कागदावरच असल्याने शेकडो जबरान जोतधारकांना जमिनीपासून वंचित राहावे लागत आहे.
राज्य व केंद्र शासनाने विविध नियम तयार करून जबरान जोतधारकांना जमीन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. परंतु योजनेची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतमजूर व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांपासून हक्कापासून डावलल्या जात आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांमध्ये कायद्यानुसार लाभ मिळत नाही. यामुळे मोर्चेकऱ्यांनी सरकारविरूद्ध घोषणेबाजी केली. उपविभागीय अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व किसान सभेनी केले. यावेळी विनोद झोडगे, डॉ. महेश कोपूलवार, अरूण वनकर, देवराव चवळे, मिलिंद भन्नारे, नामदेव नखाते, दौलत खानखुरे, रामदास कामडी, धनराज खोब्रागडे आदीसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
२५ गावांना पाणी द्या
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी व अड्याळ तलाठी साजात येणाऱ्या २५ गावांना गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेती वाया जाते. निसर्गाच्या भरोशावर असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. याकडेही नागभिड व ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांनी मोर्चाद्वारे लक्ष वेधले.