शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी मुख्याध्यापक व शिक्षिकेच्या अंगलट, फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 16:05 IST2023-10-05T16:05:01+5:302023-10-05T16:05:43+5:30
नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयातील प्रकार

शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी मुख्याध्यापक व शिक्षिकेच्या अंगलट, फसवणुकीचा गुन्हा दाखल
गडचांदूर (चंद्रपूर) :शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बनावट मान्यतापत्र तयार केल्याप्रकरणी दोन सहायक शिक्षकांचे वेतन काढून शासनाची दिशाभूल केल्याचे प्रकरण उजेडात आले. याप्रकरणी कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल मुसळे व शिक्षका योगिता शेडमाके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयात बोगस शिक्षिकेची भरती करण्यात आल्याची तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेकडे आले. चौकशीत बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षिकेची नियुक्ती केल्याचे चौकशीत पुढे आले. तसा अहवाल शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. यानंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षकांची मान्यता रद्द करून वेतनाची वसुली करण्याचे आदेश शिक्षण विभागाने द्यावे, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली होती. शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी आणि बनावट मान्यता पत्र तयार करून दोन सहायक शिक्षिकांचे वेतन काढून शासनाची दिशाभूल केल्याच्या प्रकरणात कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयाच्या मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते.
गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी यांच्या फिर्यादीनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव तथा प्रभू रामचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल मुसळे व शिक्षिका योगिता शेडमाके यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे करीत आहेत.