मोफत बस योजनेचा आगाराला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:43 PM2018-12-04T22:43:09+5:302018-12-04T22:43:37+5:30
अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना शाळेत जाण्याकरिता एसटीने मोफत प्रवास करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. परंतु राजुरा आगारातील गडचांदूर बसस्थानकावर मात्र मुलींकडून पैसे घेवून पास दिल्या जात असल्याचा प्रकार सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरुर (स्टे) : अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना शाळेत जाण्याकरिता एसटीने मोफत प्रवास करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. परंतु राजुरा आगारातील गडचांदूर बसस्थानकावर मात्र मुलींकडून पैसे घेवून पास दिल्या जात असल्याचा प्रकार सुरु आहे.
महाराष्ट्र शासनाने शिक्षणात खंड पडू नये व शाळेत जाण्यास पैसे नसल्याने एकही मुलगी शाळबाह्य असू नये, या उद्देशाने इयत्ता पाचवी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी संपर्णू महाराष्ट्रभर मोफत प्रवास पास योजना सुरु केली व तसे मोठमोठे बॅनरही लावण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मात्र गडचांदूर स्थानकावर पाहणी केली असता इयत्ता ११ वी आणि १२ वीत शिकणाऱ्या परिसरातील सर्वच महाविद्यालयातील मुलींकडून पैसे घेवून पास दिल्या जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. याबाबत सदर पास वितरकाला विचारणा केली असता सदर योजना आपल्या क्षेत्रासाठी नसल्याचे सांगण्यात आले. गडचांदूर परिसरात संपूर्ण जिवती तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात व पास काढत असतात.
१२ वी पर्यंतच्या मुलींकडून पैसे घेण्याचा प्रकाराबद्दल लेखी तक्रार मिळाल्यास योग्य ती कार्यवाही करु.
- अशोक गोमासे, सहाय्यक वाहतुक अधीक्षक, विभागीय कार्यालय, चंद्रपूर.