काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 05:00 AM2022-03-05T05:00:00+5:302022-03-05T05:00:25+5:30
नगरसेवक नंदू नागरकर हे चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, सोबतच महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पक्षाची भूमिका वठवत आले आहे. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी फिरायला गेले होते. आपल्या नेहमीच्या मित्रांसोबत चहा घेतल्यानंतर ते घराकडे परत जातांना काही अज्ञात तरुणांनी दुचाकीने त्यांची वाट अडवून हुज्जत घातली. अशातच दोन तरुणांनी मागाहून हॉकी स्टिक आणि बॅट घेऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व मनपा नगरसेवक नंदू नागरकर हे शुक्रवारी सकाळी ९ वाजता आझाद गार्डन परिसरात फिरायला गेले असता त्यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये त्यांना बॅट आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण करण्यात आली. या घटनेत नंदू नागरकर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चंद्रपूर येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पायाला टाके मारावे लागले असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव बंटी नागरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नागरकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या युवकांच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असल्यामुळे त्यांची ओळख मात्र पटली नाही. शनिवारी चंद्रपुरात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या पूर्वसंध्येला नागरकर यांच्यावर झालेला हल्ला राजकीय स्वरूपाचा तर नसेल ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नगरसेवक नंदू नागरकर हे चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, सोबतच महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पक्षाची भूमिका वठवत आले आहे. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी फिरायला गेले होते. आपल्या नेहमीच्या मित्रांसोबत चहा घेतल्यानंतर ते घराकडे परत जातांना काही अज्ञात तरुणांनी दुचाकीने त्यांची वाट अडवून हुज्जत घातली. अशातच दोन तरुणांनी मागाहून हॉकी स्टिक आणि बॅट घेऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींवरुद्ध कलम ३२४, ३४१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हल्लेखोरांना अटक न केल्यास आंदोलन- शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
- काँगेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने शहर ठाणेदारांकडे केली. पोलिसांनी हल्लेखोरांना केली नाही तर अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही निवेदनातून दिला. शिष्टमंडळात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, कोषाध्यक्ष पप्पू सिद्दीकी, एनएसयुआयचे कुणाल चहारे, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, नौशाद शेख, कासिफ अली सहभागी होते.
उच्चस्तरीय चौकशी करा- प्रकाश देवतळे
- नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. काही दिवसांपूर्वी शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची वाहने फोडण्याचा प्रकार अज्ञात हल्लेखोरांनी केला होता. या घटनेत माझी स्कॉर्पिओ गाडी फोडली होती. याबाबत रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळे यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.