दारुविक्री करताना माजी सैनिकाला अटक
By admin | Published: April 24, 2017 01:03 AM2017-04-24T01:03:08+5:302017-04-24T01:03:08+5:30
नांदाफाटा परिसरात दारूविक्रीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेसच्या वतीने ‘दे बत्ती आंदोलन’ सुरुकरण्यातआले आहे.
युवक काँग्रेसचे स्टिंग आॅपरेशन : ‘दे बत्ती’ आंदोलनाचा पहिला दणका
आवारपूर : नांदाफाटा परिसरात दारूविक्रीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेसच्या वतीने ‘दे बत्ती आंदोलन’ सुरुकरण्यातआले आहे. युवक काँग्रेसने स्टिंग आॅपरेशन करून अल्ट्राटेक वसाहतीतून दारूची तस्करी करणाऱ्या माजी सैनिकाला पकडण्यात पोलिसांना मदत केली. या कारवाईत पोलिसांनी विदेशी दारूच्या १७ बाटल्या दारु जप्त केल्या आहेत. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ८ वाजतादरम्यान करण्यात आली.
संतोष गोकुल श्रीवास (४५) रा. अल्ट्राटेक वसाहत, आवारपूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संतोष हा माजी सैनिक असून अल्ट्राटेक येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत सद्या तो सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. तोे माजी सैनिक असल्याने त्यांना काही प्रमाणात दारू बाळगण्याचा अधिकार आहे. याचाच फायदा घेत आरोपी संतोष नागपूरच्या सैनिक कँटिंगमधून दारू आणून ती विकत असल्याची माहिती युवक कॉंग्रेसला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे युवक काँग्रेसचे राजुरा विधानसभा अध्यक्ष तथा बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी ती माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आरोपींच्या घरावर छापा टाकला. त्यात तब्बल १७ विदेशी दारूच्या बॉटल जप्त केल्या. या सर्व बॉटल्सवर फक्त डिफेन्स सर्व्हिससाठी असे लिहिले होते. सदर कारवाई ठाणेदार विनोद रोकडे यांच्या मार्गदर्शनात सुनील बोरीकर, पुरुषोत्तम पंधरे, नारायण वाघमोडे, योगेश पिदूरकर, संदीप दुर्योधन आदि पोलिसांनी केली. आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी नांदा ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत, बिबी ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र अल्ली, हरून सिद्दिकी, लोकनाथ कोडापे, सागर करावला आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
अल्ट्राटेकच्या बसमधून पोहोचते दारू
संतोषसाठी कंपनीच्या वस्तीत दारू पोहचविण्याचा सोपा मार्ग म्हणजे कंपनीची बस होय. अल्ट्राटेकच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या रोज तीन बस चंद्रपुरसाठी सोडण्यात येतात. संतोष नागपूरहून चंद्रपूरपर्यंत खाजगी बसमध्ये दारु घेऊन येतो. त्यानंतर चंद्रपूरहून अल्ट्राटेक आवारपूरसाठी कंपनीच्या बसने दारु नेत असतो. संतोष माजी सैनिक असल्याने त्यांच्यावर कोणालाही शंका येत नव्हती.
आंदोलनकर्त्यांना दारूविक्रेत्यांकडून धमक्या
दारूविक्री बंद होऊन आपली अवैध आय बंद होईल म्हणून नांदाफाटा परिसरातील दारूविक्रेते चिडले आहेत. त्यामुळे ते दारूविक्रेत्यांच्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.
पोलीस प्रशासन दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे. दारूबंदीसाठी नागरिकांचा सहभाग वाढल्यास १०० टक्के दारुबंदी होणे शक्य आहे. ठिकठिकाणी नागरिकांनी अशाप्रकारे सहभाग द्यावा, जेणेकरून दारूविक्रेत्यांची दारू विकण्याची हिंमत होणार नाही.
- विनोद रोकडे,
ठाणेदार गडचांदूर
‘दे बत्ती’ आंदोलनाचा हा पहिला दणका असून पहिल्याच दिवशी दारु विक्रेत्याला पकडण्यात आले आहे. कोणाच्याही अंगावर हात टाकून युवक काँग्रेस कायदा हातात घेणार नाही. तर पोलिसांच्या मदतीने नांदाफाटा, बिबी, आवारपूर येथील दारू पूर्णपणे बंद करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
- आशिष देरकर, अध्यक्ष,
राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेस.