वैद्यकीय अधिकाऱ्यांची सौभाग्यवती मिनी मंत्रालयात
By admin | Published: March 2, 2017 12:39 AM2017-03-02T00:39:34+5:302017-03-02T00:39:34+5:30
गोंडपिपरी तालुक्यातील धानापूरचे किशोर वडपल्लीवार हे सध्या पोंभूर्णा येथे वैद्यकीय अधिकारी आहेत.
नागरिकांचे लक्ष : करंजी परिसराला विकासाची आशा
गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील धानापूरचे किशोर वडपल्लीवार हे सध्या पोंभूर्णा येथे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्या सौभाग्यवती स्वाती वडपल्लीवार उच्च शिक्षित असून जिल्हा परिषद निवडणुकीत करंजी-धानापूर क्षेत्रातून त्या प्रचंड मतांनी निवडून आल्या. त्यामुळे रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पत्नी जि.प. सदस्यत्त्वाची सुत्रे हाती घेणार असल्याने गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे बघितल्या जात आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील वडपल्लीवारांच्या परिवारातील किशोर वडपल्लीवार यांच्या पित्यासह मागील अनेक वर्षापासून रुग्णसेवा सुरू आहे. पिता डॉ. उद्धव वडपल्लीवार यांनी तालुक्यातील धानापूर, आक्सापूर, करंजी, पेल्लूर, बेरडी, चेकबेरडीसह अनेक गावात जावून रुग्णांची सेवा करीत आहेत. तर पुत्र किशोर वडपल्लीवार हे वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र डॉ.उद्धव वडपल्लीवार यांना गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोणातून जनतेपर्यंत कसे जाता येईल, हाही ध्यास त्यांच्या मनी होता. परंतु मुलगा शासकीय डॉक्टर असल्याने त्यांना ते शक्य नव्हते. त्यामुळे सून स्वाती किशोर वडपल्लीवार या उच्च शिक्षित असल्याने त्यांना पुढे करत जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरविले आणि त्या भरघोष मतांनी निवडूनही आल्या.
स्वाती वडपल्लीवार या एमएसस्सी, एम.ए., बी.एड. असे उच्च शिक्षण घेतलेल्या आहेत. डॉ.वडपल्लीवारांचे ध्येय पूर्ण झाले असले तरी जनता आता वडपल्लीवार कुटुंबाकडे विकासाच्या दृष्टीकोणातून बघत आहेत. स्वाती वडपल्लीवार यांनी जनतेनी दाखविलेला विश्वास फक्त तो फक्त जनतेच्या विकासासाठीच करणार असल्याचे मत ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.
शिक्षण क्षेत्रापासूनच मला जनतेची सेवा करण्याचा मानस होता. आणि आता जिल्हा परिषदेची सदस्य झाल्याने परिवारातील कर्त्या पुरुषांप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जोपासत मिळेल तो निधी जनतेच्या विकासासाठी पुरविणार असल्याचेही त्या म्हणाल्या. नवनिर्वाचीत सदस्य स्वाती वडपल्लीवार या उच्च शिक्षीत असल्याने परिसरातील नागरिकांना त्यांच्याकडून विकास कामांची आशा आहे. त्या समस्या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून सोडवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)