भद्रावतीनजीक सापडली २० कोटी वर्षांपूर्वीची जिवाष्मे पाने, प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा
By राजेश मडावी | Published: May 24, 2023 06:08 PM2023-05-24T18:08:45+5:302023-05-24T18:14:15+5:30
ज्युरासिक काळातील नवीन इतिहासाला उजाळा
चंद्रपूर : ज्युरासिक ते पर्मियन या १९.५ कोटी वर्षांदरम्यान काळातील ग्लासोप्टेरिस या प्रजातीच्या वनस्पती पानांची सुंदर जिवाष्मे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीनजीक सापडल्याचा दावा चंद्रपुरातील पर्यावरण व जीवाष्म अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी बुधवारी केला.
चंद्रपूर जिल्हा हा भूशास्त्रीयदृष्ट्या एक संग्रहालय असून येथे ३०० ते ६ कोटी वर्षे जुने बहुतेक प्रकारचे खडक आणि २५ कोटी ते २५ हजार वर्षे प्राचीन जिवाष्मे आढळतात. २० कोटी वर्षांदरम्यान वृक्ष जिवंत असताना विशाल डायनोसोर जिवंत होते. पृथ्वीवर पांजिया नावाचा एकच खंड होता. भारत हा भूप्रदेश आजच्या आस्ट्रेलियाला लागून होता. प्राचीन भारत व चीनच्या मध्ये टेथीस नावाचा समुद्र होता. पुढे कोट्यवधी वर्षांनी भारताचा भूखंड उत्तरेला सरकत गेला व चीनच्या भूखंडाला टक्कर दिली. यातून हिमालय निर्माण झाला. अजूनही भूकवचाची ही गती उत्तरेकडे सरकत आहे, असा दावा अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे.
जिवाष्मे असल्याची भूशास्त्र विभागाची नोंद
भद्रावती ते चंदनखेडा मार्गावर शेती व जंगलात काही ठिकाणी ही अतिप्राचीन पुरावे सापडली आहेत. भद्रावती व वरोरा परिसरात डायनोसोरची जिवाष्मे आढळली होती. या परिसरात पर्ण जिवाष्मे असल्याची भूशास्त्र विभागाची नोंद आहे. परंतू आतापर्यंत उत्कृष्ट जिवाष्मे मिळाली नव्हती. आता आढळलेल्या जिवाष्म पानांमुळे ज्युरासिक काळातील नवीन इतिहासाला उजाळा मिळेल, असेही प्रा. सुरेश चोपणे यांचे म्हणणे आहे.