चंद्रपुरातील डायनासोरचे जिवाश्म केंद्र व राज्य सरकारकडून दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:29 AM2021-07-28T04:29:38+5:302021-07-28T04:29:38+5:30
गोंडपिपरी (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्याच्या भूगर्भावर डायनासोर हा महाकाय जीव अस्तित्वात होता. वरोरा तालुक्यातील पिजदुरा येथे भारतातील व विदेशी ...
गोंडपिपरी (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्याच्या भूगर्भावर डायनासोर हा महाकाय जीव अस्तित्वात होता. वरोरा तालुक्यातील पिजदुरा येथे भारतातील व विदेशी अभ्यासकांना डायनासोरचे जिवाश्म आढळून आलेत. अधुनमधून विदेशी अभ्यासक पिजदुऱ्याला भेट देत असतात. जागतिक पर्यटनाला आकर्षित करणारे हे स्थळ केंद्र आणि राज्य सरकारचा उदासीन धोरणामुळे दुर्लक्षित आहे. पिजदुरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डायनासोरचे जिवाश्म जपून ठेवले आहेत.
ज्युरासिक पार्क, ज्युरासिक वर्ड या सिनेमातून डायनासोरची सर्वसामान्यांना ओळख झाली. सिनेमात दिसणाऱ्या या विशाल जिवांनी कुतूहल वाढविले. खरंच हे जीव अस्तित्वात होते काय? याची उत्सुकता बालगोपाळांना पडली. जगात अनेक ठिकाणी झालेल्या संशोधनातून डायनासोरच्या विविध प्रजाती प्रकाशात आल्या. जागतिक स्तरावर अनेक ठिकाणी जिवाश्म आढळून आलेत. भारतात सापडलेल्या जिवाश्मावरून अनेक भागात डायनासोरच्या विविध प्रजाती अस्तित्वात होत्या, हे सिध्द झाले. विदर्भाचा शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या भूगर्भावर महाकाय टायटोनोसोर या विशाल डायनासोरचे अस्तित्व होते. याचा पुरावा १८६० मध्ये ब्रिटिशांना गवसला. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या पिजदुरा या गावाला लागून असलेल्या टेकडीवर जिवाश्म आढळून आलेत. हे जिवाश्म साडेसहा करोड वर्षांपूर्वीचे असावेत, असा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला आहे. टायटोनोसोरप्रमाणेच जलाशयात आढळून येणाऱ्या जिवांचेही जिवाश्म येथे सापडले आहेत. या जिवाश्मात कवट्या, कशेरूक, हातापायांची हाडे, चिलखती चखल्या, दात, विष्ठा यांचा समावेश आहे. या जिवाश्मांचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातील संशोधक पिजदुऱ्याला यायचे. गावातील मुलांना सोबत घेऊन ते दगड गोळा करायचे. आपल्या टेकडीवर सापडणारा दगड अमूल्य आहे, याची माहिती गावकऱ्यांना झाली. कधीकाळी आपल्या गावात डायनासोर होते, ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले. पिजदुरा ग्रामपंचायतीने आपल्या लेटरहेडवर डायनासोरचे चित्र उतरविले आहे. आपल्या गावाची ओळख ‘डायनासोरचे गाव’ अशी व्हावी, ही इच्छा गावकऱ्यांची आहे.
ज्युरासिक पार्क झाल्यास जागतिक पर्यटनाला वाव
पिजदुरा येथे जुरासिक काळातील जिवाश्म सापडणे ही अभिमानाची बाब आहे. मात्र अभ्यासाच्यानिमित्ताने पिजदुरा येणारे लोक तिथे आढळणारे जिवाश्म सोबत घेऊन जातात. पिजदुराचे जिवाश्म व चंद्रपूरचा गौरव वाचवायचा असेल, तर सरकारने पिजदुरा येथे जुरासिक पार्कची घोषणा करावी. पिजदुराला संरक्षित गाव म्हणून घोषित केले पाहिजे. जगातील लोक चंद्रपुरात येऊन पिजदुरा येथील जिवाश्म पार्क बघू शकतील. तसे झाले तर जिल्ह्यात पर्यटन वाढेल अन् यातून काहींना नक्कीच रोजगार प्राप्त होऊ शकतो.
- अशोक सिंह ठाकूर, इतिहास अभ्यासक, चंद्रपूर.