चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात आढळले जीवाश्म; डायनोसोरचे की दुर्मिळ हत्तीचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 08:34 PM2021-12-01T20:34:22+5:302021-12-01T20:59:37+5:30

Chandrapur News वरोरा तालुक्यात ४ फूट लांब आणि १ फूट रुंद पायाचे हाड, ३ फूट लांब बरगडीचे हाड आढळले आहे. हे १५-२० हजार वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ हत्तींचे असावे असा अंदाज चंद्रपूर येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी वर्तविला आहे.

Fossils found in Warora taluka of Chandrapur district; A dinosaur or a rare elephant? | चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात आढळले जीवाश्म; डायनोसोरचे की दुर्मिळ हत्तीचे?

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात आढळले जीवाश्म; डायनोसोरचे की दुर्मिळ हत्तीचे?

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वेक्षण आणि प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच होईल नेमका उलगडा

 

चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात ४ फूट लांब आणि १ फूट रुंद पायाचे हाड, ३ फूट लांब बरगडीचे हाड आढळले आहे. अवलोकनावरून ही हाडे डायनोसोर विशालकाय प्राण्याची असावी वा तेथील भूस्तर पाहता हे १५-२० हजार वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ हत्तींचे असावे असा अंदाज चंद्रपूर येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी वर्तविला आहे. ही बाब भूशास्त्र विभागाला कळविली आहे. त्यांच्या सर्वेक्षण आणि प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच ते जीवाश्म नेमक्या कोणत्या प्राण्याचे आहे आणि काळ कोणता आहे ते कळेल.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या पश्चिमेला तुळाना गावाजवळून वर्धा नदी वाहते. नदीच्या पात्रात काही ठिकाणी मागील हिमयुगीण काळात महापुरात वाहत आलेला दगड-गाळाचा थर आहे. त्याचठिकाणी ६ कोटी वर्षांच्या काळालातील बेसाल्ट खडकाचे थर आहेत. दोन्ही थरांची सळमिसळ झाल्याने काळाचा अंदाच घेणे कठीण होते. स्थानिक शेतकरी विजय ठेंगणे आणि त्यांची शाळकरी मुले नदी पात्रात फिरत असताना त्यांना हाड सदृश्य खडक आढळले होते. परंतु ही हाडे किंवा दगड वा अन्य काही हे त्यांना कळले नाही. त्यांनी चंद्रपूर तेथील भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांच्याशी संपर्क करून येथे संशोधन करण्याची गरज व्यक्त केली. २९ नाेव्हेंबर २०२१ रोजी त्यांनी जीवाश्म स्थळी भेट देऊन निरीक्षणे केली असता ती हाडे हे जीवाश्म असून डायनोसोर किंवा हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याची असावी, असा अंदाज व्यक्त केला.

चार फूट लांबीचे मांडीचे हाड

यातील मोठे जीवाश्म हे ४ फुट लांब मांडीचे हाड आहे. जवळच छातीच्या बरगडीचे ३ फूट लांब हाड आढळले. हाडाच्या आकारावरून हा प्राणी १५ फूट उंच आणि आणि २० फुट लांब असावा. यावरून हा जीव एकतर डायनोसोर किंवा विशाल आकाराचा हत्ती असला पाहिजे, असा अंदाज आहे.

गेल्या काही वर्षांपासून रेती उत्खननाचे काम सुरू असल्याने काही हाडे पाण्यात फेकली असल्याचे गावकऱ्याचे मत आहे. तर काही जीवाश्मे फेकण्यात गेली असावी, असे चोपणे यांना वाटते.

तपासणीअंती प्राणी कळेल

हे जीवाश्म अगदी नाजूक आणि कच्चे असल्यामुळे ते काही १५-२० हजार वर्षादरम्यानाचे असावे, असा अंदाज व्यक्त केला. आकारावरून ते विशालकाय डायनोसोरचे असल्याचे वाटते. परंतु ज्या गाळात ते आढळतात आणि जितके ते जीवाश्म नाजूक आहे त्यावरून आणि त्यांना अलीकडे ह्याच नदीत सापडलेले हत्तीच्या दातांचे पुरावे यावरून ते हत्तीचे असावे, असा अंदाज प्रा सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला. ही बाब भूशास्त्र विभागाला कळविली आहे. त्यांच्या सर्वेक्षण आणि प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच ते जीवाश्म नेमक्या कोणत्या प्राण्याचे आहे आणि काळ कोणता आहे ते कळेल.

Web Title: Fossils found in Warora taluka of Chandrapur district; A dinosaur or a rare elephant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास