साडेचार वर्षांत त्याने लावली हजारांवर अंत्यविधींना हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:32 AM2021-09-24T04:32:32+5:302021-09-24T04:32:32+5:30
नागभीड : मृत्यू ही खरंतर दुःखद घटना. मृतकाच्या अंत्यविधीला कोणीही आनंदाने जात नाही. मात्र दु:खात सहभागी होण्यासाठी अशाप्रसंगी जावेच ...
नागभीड : मृत्यू ही खरंतर दुःखद घटना. मृतकाच्या अंत्यविधीला कोणीही आनंदाने जात नाही. मात्र दु:खात सहभागी होण्यासाठी अशाप्रसंगी जावेच लागते. नागभीड येथील एका व्यक्तीची अंत्यविधीला हमखास उपस्थिती असते. म्हणूनच गेल्या साडेचार वर्षांत त्याने किमान हजारांवर अंत्यविधींना हजेरी लावली आहे.
अब्दुल हक अब्दुल लतीफ शेख असे या व्यक्तीचे नाव असून, तो येथील स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या स्वर्गरथावर चालक आहे. बदललेल्या काळाची गरज आणि मागणी म्हणून या पतसंस्थेने नागभीड येथे स्मशानघाटात शव नेण्यासाठी स्वर्गरथाची सेवा उपलब्ध करून दिली आहे. जेव्हा हा स्वर्गरथ नागभीड येथे दाखल झाला, तेव्हा पतसंस्थेच्या संचालक मंडळाने या रथासाठी चालक हवा म्हणून अनेकांना विचारणा केली. मात्र, प्रत्येकाने नकारच दिला. यावेळी अब्दुलने मात्र होकार दिला आणि त्याने आपली सेवा सुरू केली. ती आजही सुरूच आहे.
अब्दुलच्या या सेवेला आता साडेचार वर्ष होत आहेत. नागभीड, ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही येथे तर अब्दुलची सेवा नियमित सुरू असतेच. पण या तालुक्यातील अनेक गावांमध्येही अब्दुल सेवा देतो. कोरोना काळात तर शव नेण्यासाठी या स्वर्गरथाला मोठी मागणी होती. या काळात अब्दुलची चांगलीच तारांबळ उडायची. पण वेळेचे नियोजन करून अब्दुलने ही वेळही निभावून नेली.
जेव्हा हा स्वर्गरथ नागभीड येथे दाखल झाला, तेव्हा दोन वर्षापर्यंत या रथावर एक नोंदणी बुक ठेवण्यात आले होते. तेव्हा पाचशे व्यक्तींना या स्वर्गरथाची सेवा प्राप्त झाली होती. आता मात्र गेल्या अडीच वर्षांपासून नोंदीच करण्यात येत नाहीत. तरीही आतापर्यंत हजार-बाराशेच्या आसपास या स्वर्गरथाने मृत व्यक्तींना सेवा दिली आहे, अशी माहिती स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय गजपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बॉक्स
तत्काळ पोहोचतो मृतकाच्या घरी
अब्दुलची कामाची एक खास पद्धत आहे. मृतकाच्या घरून स्वर्गरथाबाबत निरोप आला की निश्चित वेळ विचारतो आणि त्यावेळेच्या पंधरा मिनिटे अगोदरच तो स्वर्गरथ संबंधित व्यक्तीच्या घरासमोर उभा करतो. शव स्मशानघाटात पोहोचले आणि शव रथाबाहेर काढले की रथात सांडलेली फुले व अन्य साहित्य बाहेर काढून रथाची साफसफाई करतो. पाण्याची सोय उपलब्ध असेल तर स्वर्गरथ धुवूनही काढतो.
230921\img-20210923-wa0016.jpg
स्वर्गरथाच चालक अब्दुलचा फोटो