चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:39 PM2018-03-22T15:39:27+5:302018-03-22T15:39:36+5:30
मागील आठ दिवसांपासून महालगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावातील घराच्या अंगणात बांधलेल्या बकरीला ठार करीत मागील चार दिवसात चार जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील आठ दिवसांपासून महालगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावातील घराच्या अंगणात बांधलेल्या बकरीला ठार करीत मागील चार दिवसात चार जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत शेगाव उपवनक्षेत्रातील महालगावात मागील आठ दिवसांपासून बिबट्याने दिवसा व रात्री धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. बिबट्याने मागील चार दिवसात विधवाज देवराव महातळे, दत्तु आनंद उरकुडे, संतोष मारोती तुराळे, दिवाकर बदखल, सुर्यभान फरचाके यांची जनावरे ठार केली आहेत. दरम्यान, बुधवारी सुर्यभान परचाके यांच्या घरातील अंगणात बांधून असलेल्या बकरीवरही हल्ला करून ठार केले. बकरीच्या ओरडण्यामुळे नागरिक घटनास्थळी धावून आले असता त्यांना बिबट दिसला. त्यांनी बिबट्याला हुसकावून लावले. दहशतीमुळे शेतातील कामावर विपरित परिणाम झाला आहे. सदर बिबट महालगाव परिसरातील अनेक गावात जात असल्याने नागरिक रात्री घराबाहेर पडायला घाबरत आहे. याबाबत नागरिकांनी वरोरा व शेगाव वनविभागाकडे तक्रार नोंदविली असून वन कर्मचारी नागरिकांना सोबत घेऊन गस्त घालत आहे. डोळ्यात तेल घालून जनावरांवर शेतकरी पाळत ठेवत आहे. वनविभागाने कॅमेरे लावून बिबट्याचा शोध घेणे सुरू केले आहे.