वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मारहाण, चौघांना अटक; आठवडाभरातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 03:20 PM2023-02-08T15:20:42+5:302023-02-08T15:24:02+5:30

डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

four arrested for beating up Medical college doctor in chandrapur; Second incident in a week | वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मारहाण, चौघांना अटक; आठवडाभरातील दुसरी घटना

वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मारहाण, चौघांना अटक; आठवडाभरातील दुसरी घटना

googlenewsNext

 चंद्रपूर : आठवडाभरापूर्वीच वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी मध्यरात्री कर्तव्यावर असणाऱ्या प्रशिक्षनार्थी डॉक्टरांसोबत शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार पुन्हा चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आला. याप्रकरणी डॉक्टरांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यामध्ये कलम ३५३, २९४, ५०६, ५०३ अन्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. चारही जणांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. शेख सोहेल शेख सोहल (३०), जहागीर खान मज्जिद खान (२९), मोबिन शेख करीम शेख (२९, तिघेही रा. घुटकाळा), महोम्मद अजगर ऊर्फ इरफान (२९, रा. ऱऱ्हेमतनगर) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णांची मोठी गर्दी असते. सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास वरील तरुणांच्या मित्राचा अपघात झाला. वरील चौघेही जण त्याला घेऊन रात्री रुग्णालयात गेले. दरम्यान, प्रशिक्षणार्थी डॉक्टर कर्तव्यावर होते. त्यांनी घटनेचे गांभीर्य बघून उपचारास सुरुवात केली. मात्र, अपघातग्रस्तांच्या मित्रांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांशी वाद घालत वरिष्ठ डॉक्टरांना उपचारासाठी बोलविण्याचा तगादा लावला. चौघांनीही डॉक्टरांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. संतापलेल्या डॉक्टरांनी सकाळी शहर पोलिस ठाणे गाठत घटनेची तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी चौघांवरही विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. ही कारवाई शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक डोमकावळे करत आहेत.

डॉक्टरांच्या सुरक्षेचे काय?

मागील सहा ते सात दिवसांपूर्वीसुद्धा रुग्णालयात डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाणीची घटना घडली होती. या घटनेनंतर डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान, प्रशासनाने सुरक्षा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला. मात्र, पुन्हा तशीच घटना घडल्याने महाविद्यालयातील डॉक्टरांकडून निषेध व्यक्त केला जात असून डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Web Title: four arrested for beating up Medical college doctor in chandrapur; Second incident in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.