भाजपाचे चार, काँग्रेसचे पाच उमेदवार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:07 AM2019-10-02T01:07:43+5:302019-10-02T01:08:50+5:30
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण ४४५ अर्जाची उचल करण्यात आली. राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर मतदारसंघातून एकूण सहा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहे. एकूण १९९ व्यक्तींनी ४४५ अर्जाची उचल केली आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपले चारही उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये राज्याचे हेवीवेट मंत्री सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), आमदार अॅड. संजय धोटे (राजुरा), आमदार नाना श्यामकुळे (चंद्रपूर) व आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया (चिमूर) यांचा समावेश आहे. काँग्रेसनेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी), डॉ. विश्वास झाडे (बल्लारपूर) तर प्रतिभा धानोरकर यांना वरोरा विधानसभेतून उमेदवारी जाहीर केली आहे. यातील आमदार विजय वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर यांनी आपले डमी नामांकन दाखल केले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. कीर्तीकुमार भांगडिया यांना भाजपकडून तर आ. विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरीसाठी काँगे्रसकडून तिकीट मिळेल, हे निश्चित होते. किशोर जोरगेवार यांनी तिकिटासाठी दिल्लीला ठाण मांडून होते. राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर हेदेखील वरोरा विधानसभा क्षेत्रात आपल्या पत्नीला काँग्रेसची तिकीट मिळावी, यासाठी आग्रही होते. या दोघांनाही पक्षाने तिकीट दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून तथागत पेटकर (चंद्रपूर), गोदरू जुमनाके (राजुरा), चंद्रलाल मेश्राम (ब्रह्मपुरी), अरविंद सांदेकर (चिमूर), अॅड. अमोद बावणे (वरोरा) यांना रिंगणात उतरविले आहे. राकाँचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी मुंबईत शिवबंधन बांधले. वरोऱ्यातून शिवसेनेची उमेदवारी जाहीर न झाल्याने उत्सुकता ताणली जात आहे. चंद्रपुरात किशोर जोरगेवार यांच्या नावाला विरोध दर्शविण्यात येत असल्याने काँग्रेसने चंद्रपूरच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नसल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात सहा अर्ज दाखल
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण ४४५ अर्जाची उचल करण्यात आली. राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर मतदारसंघातून एकूण सहा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहे. एकूण १९९ व्यक्तींनी ४४५ अर्जाची उचल केली आली आहे. ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार, वरोरा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर व अशोक घोडमारे, चिमूर मतदारसंघातून वनिता राऊत व कैलास बोरकर यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.