गुप्तधनासाठी नवविवाहितेकडून अघोरी पूजाप्रकरणी मांत्रिकासह चौघांविरुद्ध चंद्रपुरात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:44 AM2019-07-10T10:44:20+5:302019-07-10T10:50:47+5:30
गुप्तधनासाठी नवविवाहितेकडून अघोरी पूजा करवून घेतल्याप्रकरणी मंत्रिकासह चौघांविरुद्ध वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: गुप्तधनासाठी नवविवाहितेकडून अघोरी पूजा करवून घेतल्याप्रकरणी मंत्रिकासह चौघांविरुद्ध वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नवविवाहितेचा पती समीर गुणवंत कारेकर, सासरा गुणवंत कारेकर, सासू विमलाबाई गुणवंत कारेकर व मांत्रिक अरुण दहेकर यांच्यावर भांदवी 498, जादूटोणाविरोधी कायदा कलम 2013 मधील कलम 2(1), 4, 5, 6, 3 शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारेकर परिवाराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर हे कुटुंब बेपत्ता झाले आहे.
काय आहे घटना?
लग्न करून घरी आणलेल्या नववधूच्या अंगावरील हळद उतरत नाही तोच दुसऱ्याच दिवसापासून तिच्याकडून गुप्तधनाच्या प्राप्तीसाठी अघोरी कृत्य करायला लावल्याचा खळबळजनक प्रकार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उजेडात आणला होता. या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासू व सासºयावर जादुटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी पीडितासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मंगळवारी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे केली होती.
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीनुसार, चिमूर तालुक्यातील बिडकर येथील माजी जि.प. सभापती गुणवंत कारेकार यांचा मुलगा समीर कारेकार याने १९ ऑगस्ट २०१८ रोजी उच्चविद्याविभुषित सविता नामक युवतीशी विवाह करून घरी आणले. त्याचदिवशी सविताची आई घसरून पडली असता तिने सवितावर अवदसा, अपशकुणी असल्याचा ठपका ठेवला. यानंतर दुसºयाच दिवसापासून गुप्तधनाच्या लालसेपोटी पती, सासू व सासऱ्यांनी मिळून सविताला अघोरी पूजा करायला भाग पाडले. दररोज पहाटे ३ वाजता दर्गा पाण्याने धुवून स्वच्छ करणे. नंतर दर्ग्यामधील कासवाला पाण्याने आंघोळ घालणे. समीरच्या अंगात ताजुद्दीन बाबा येतो त्यावेळी तो शिवीगाळ व मारझोड करेल ते सहन करणे. कासवाची गंध, कुंकू, हळद लावून पूजा करणे, पूजा केल्यानंतर कासवाला दर्ग्याजवळ बसून एक-दीड किलो मुरमुरे खाऊ घालणे. हे करत असताना तिला दररोज मारझोड करायचा, असे तक्रारीत म्हटले आहे.
दर्ग्यावर गुजगाव येथील महाराज येत असे. हा प्रकार पहाटे ३ ते दुपारी २.३० वाजतापर्यंत चालायचा. दरम्यानच्या काळात सविताला पाणी, चहा वा इतर कोणतेही अन्न खाऊ देत नव्हते. हा प्रकार दररोज चालायचा. या अघोरी कासव पुजेने पूजेत ठेवलेला चांदीचा नागोबा प्रसन्न होऊन गुप्तधन आपोआप वर येईल, असे सविताला सांगायचे, असेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये म्हणून सविताला तंबी देत जिवे मारण्याची धमकी दिली. यासह तिच्याजवळील मोबाईल फोनही हिसकावून घेतला. तिला माहेरीही जाऊ देत नव्हते, असे गंभीर आरोपही तक्रारीत आहे. तिने हा प्रकार तब्बल ५० दिवस सहन केला. सविताचे माहेर गडचिरोली जिल्ह्यातील आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तिला वडिलाने तिला माहेरी नेले. तिने सर्व प्रकार वडिलांना सांगितला. यानंतर राज्य महिला आयोग, वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली होती.