चार धरणे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:00 PM2018-07-11T23:00:51+5:302018-07-11T23:01:15+5:30

गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

Four dams overflow | चार धरणे ओव्हरफ्लो

चार धरणे ओव्हरफ्लो

Next
ठळक मुद्देसंततधार पाऊस : जिल्ह्यात आतापर्यंत ४७७ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अंमलनाला, पकडीगुड्डम, चंदई, लभानसराड ही चार धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर चारगाव, आसोलामेंढा, घोडाझरी, डोंगरगाव व इरई धरणात बऱ्यापैकी पाणी साठा जमा झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात ४७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गतवर्षी जिल्ह्यात केवळ ५० ते ५५ टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात अनेक गाव व शहरांवर पाणी संकट ओढावले होते. यातच चंद्रपूर शहराची जीवनदायिनी असलेल्या इरई धरणाने तळ गाठल्याने एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. अनेक गावात व शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे जिल्हावासीयांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली होती.
जून महिन्यात पावसाने हजेरी लावून नंतर हुलकावणी दिली. मात्र जुलै महिन्यात पावसाची चांगलीच बॅटींग सुरू असून अनेक भागातील जजजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे.
काही ठिकाणी छोट्या-मोठ्या नाल्यांना पूर आला असून शेतपिकाचे नुकसान झाले आहे. पकडीगुड्डम, चंदई, अंमलनाला, लभानसराड या धरणाच्या वेस्टवेअरमधून पाणी ओसंडून वाहत आहे. तर इतरही प्रकल्प ५० टक्के वर भरले आहेत.
कोरपना तालुक्यात सर्वाधिक ८१८.२६ मिमी पाऊस
गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात १ जून ते १० जुलैपर्यंत सरासरी ४७७ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. मागिल वर्षी १० जुलै पर्यंत सरासरी १५७.५८ मिमी पाऊस पडला होता. १० जुलैपर्यंत चंद्रपूर तालुक्यात ४१८ मिमी, बल्लारपूर ४३७ मिमी, गोंडपिपरी ४५५.६ मिमी, पोंभूर्णा ३८७.७ मिमी, मूल ५६४.६ मिमी, सावली ३९५.८ मिमी, वरोरा, ५५६.२४ मिमी, भद्रावती ५४२.३ मिमी, चिमूर ४८१ मिमी, ब्रम्हपूरी ३७३.६ मिमी, सिंदेवाही ४३०.८ मिमी, नागभीड ३२८.३ मिमी, राजुरा ४०४.५२ मिमी, कोरपना ८१८.२६ मिमी तर जिवती तालुक्यात ५६१.९ मिमी असे एकुण ४७७ मिमी पाऊस झाला असून सरासरी ४६.६ एवढी आहे.
इरई धरणात २४.४८ टक्के जलसाठा
चंद्रपूरकरांची तहाण भागविणाऱ्या इरई धरणातूनच वीज निर्मिती केंद्राला पाणी दिले जाते. परंतु, पाणीसाठा नसल्याने १५ जुलैपासून सीटीपीएसचा पाणी पुरवठा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. तसे निर्देश देण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बुधवारपर्यंत इरई धरणात २४.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर व वीज निर्मिती केंद्रावरील पाणी संकट काहीसे दूर झाले असून शहराला आता नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Four dams overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.