पीएफचे पैसे स्वतःच्या खात्यात वळविणारे चार कर्मचारी बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:47 AM2024-09-11T11:47:25+5:302024-09-11T11:48:02+5:30
जिल्हा परिषद : चौघांकडून पैसे वसूलीनंतर लगेच कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे लाखो रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळविणाऱ्या तीन लेखापाल व कार्यक्रम सहायक, अशा चार कंत्राटी कर्मचाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी रविवारी (दि. ८) तडकाफडकी सेवेतून बडतर्फ केले. लेखापाल नामदेव येनूरकर, लेखापाल (अंकेक्षण) प्रवीण सातभाई, लेखापाल राकेश नाकाडे आणि कार्यक्रम सहायक प्रकाश मोहुर्ले, अशी बडतर्फ कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात शेकडो कंत्राटी कामगार काम करीत आहेत. त्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा करण्याची जबाबदारी लेखापाल नामदेव येनूरकर, लेखापाल (अंकेक्षण) प्रवीण सातभाई, लेखापाल राकेश नाकाडे आणि कार्यक्रम सहायक प्रकाश मोहुर्ले या कर्मचाऱ्यांकडे होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी नियमित जमा केला. मात्र, त्यानंतर घोळ करणे सुरू केले. या सर्वांनी ठरवून भविष्य निर्वाह निधीची रक्कम स्वतःच्या खात्यात वळती केली. या प्रकाराला सन २०२१-२२ मध्ये सुरुवात झाली. दोन वर्षे हा प्रकार सुरू होता.
"जिल्हा परिषदेच्या लेखा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या तपासणीत चारही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खात्यात पैसे वळते केल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करून सेवा समाप्त करण्यात आली. बडतर्फ कर्मचाऱ्यांचा कार्यभार त्याच विभागातील इतर कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे."
-डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर