राजुरा क्षेत्रात मंजूर झालेल्या चार आरोग्य केंद्राचे काम रखडले
By admin | Published: July 8, 2015 01:14 AM2015-07-08T01:14:10+5:302015-07-08T01:14:10+5:30
शासनाने मंजुर केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार क्षेत्रातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी
चंद्रपूर : शासनाने मंजुर केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार क्षेत्रातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आणि इमारत बांधकामासाठी अडीच वर्षे लोटून गेल्यावरही निधी मिळाला नाही. नांदा(बिबी), विरूर (स्टे), शेणगाव व भंगाराम तळोधी या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी केली आहे.
राज्य शासनाने १७ जानेवारी २०१३ च्या आरोग्य विभागाच्या शासन निर्णय क्रमांक १४१/आरोग्य ३ नुसार सन २००१ च्या लोकसंख्येच्या निकषावर आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व नक्षलग्रस्त भागातील शासनाचा विशेष कृती कार्यक्रम लागू असलेल्या भागात खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली. अपुऱ्या सोई, कुपोषणासह आरोग्याचे अनेक प्रश्न आणि दुर्गम भागात असल्याने व्यापक जनहित लक्षात घेता या आरोग्य केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.), कोरपना तालुक्यातील नांदा (बिबी), जिवती तालुक्यातील शेणगाव आणि गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील चार प्राथमिक केंद्र अडीच वर्षांपूर्वी मंजूर झाले. परंतु खास बाब म्हणून मंजुर झालेल्या या चारही केंद्रांना अद्याप निधीच मंजुर झाला नाही.
आता जनतेची निकड लक्षात घेता, सरकारने तातडीने या चारही प्राथमिक स्वास्थ केंद्रासाठी निधी द्यावा आणि याकरिता आरोग्य विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांना आरोग्य मंत्री नामदार डॉ.दीपक सावंत आणि सार्वजनिक आरोग्य संचालनालयाच्या संचालकाकडे केली आहे. (प्रतिनिधी)