जामगाव येथील आगीत चार घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:41 AM2018-03-15T01:41:32+5:302018-03-15T01:41:32+5:30
तालुक्यातील जामगाव येथे बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडून आणखी तीन घरेही आगीत भक्षस्थानी पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : तालुक्यातील जामगाव येथे बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडून आणखी तीन घरेही आगीत भक्षस्थानी पडले. नागरिकांनी घटनास्थळी धावून आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत घरातील साहित्य जळून खाक झाल्याने चारही कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.
वरोरा तालुक्यातील जामगाव येथील एका घराला अचानक आग लागली. आगीत घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग इतरत्र पसरली. या आगीत घनश्याम मडावी, महादेव सोनवने, संगिता उईके, मोरेश्वर गेजी यांच्या घरांना आगीने वेढले. त्यात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग विझविण्याकरिता नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने तीव्र रूप धारण केल्याने आग विझविण्याकरीता वरोरा येथील अहेतेशाम अली डेव्हलपर्सचे पाणी टँकर व जीएमआर कंपनीच्या अग्नीशामक दलाने घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
आगीचे पंचनामे करण्याकरिता तातडीने मंडल निरीक्षक व तलाठी यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. पंचनामा अहवाल येताच शासनाकडून तातडीची मदत त्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे.
- सचिन गोसावी,
तहसीलदार, वरोरा