पाण्यासाठी चार किलोमीटर पायपीट

By Admin | Published: May 3, 2017 12:44 AM2017-05-03T00:44:24+5:302017-05-03T00:44:24+5:30

जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक नसली तरी काही दुर्गम गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थांना तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे.

Four kilometers of footpath for water | पाण्यासाठी चार किलोमीटर पायपीट

पाण्यासाठी चार किलोमीटर पायपीट

googlenewsNext

पोलीस आले मदतीला : लोलडोह व पाटागुड्याचा टंचाई आराखड्यात समावेश नाही

मिलिंद कीर्ती चंद्रपूर
जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक नसली तरी काही दुर्गम गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थांना तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अशा गावांचा टंचाई आराखड्यामध्ये केला समावेश नसल्याचे पुढे आले आहे. स्थानिक लोकांनी ओरड केल्यावर गटविकास अधिकाऱ्याने पाटागुडा व लोलडोह या गावांचा विशेष प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर केला. त्यातील पाटागुडामध्ये पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पोलीस विभागाने तत्परता दाखवून बोअरवेल खोदून दिली आहे.
जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी ४१३ गावांसाठी प्रस्तावित टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यामध्ये जिवती तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमधील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भयावह आहे. या गावांमधील पाण्याचे स्रोत आटले आहेत. आसपास कोठेही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे गावापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचत नाही. या परिस्थितीमध्ये महिलांना पहाटेची झोप मोड करून तीन ते चार किलोमीटर जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. पाणी मिळाल्यानंतर ते घागरींमध्ये भरून डोक्यावर पायी चालत आणावे लागत आहे. ही दररोजची स्थिती असली तरी त्याकडे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे फारसे लक्ष नाही. त्यामुळेच टंचाई आरखडा तयार करताना अनेक गावांचा समावेश करण्यात आलेला नाही.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या टंचाई आराखड्यात जिवती तालुक्यातील पाटागुडाचा (मांगगुडा) समावेश नव्हता. जिवती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी २० एप्रिल रोजी जिल्हा परिषदेकडे पाटागुडाचा विशेष प्रस्ताव पाठविल्यानंतर टंचाई उपायोजना हाती घेण्यात आली आहे. तेथे भीषण पाणीटंचाई आहे. ही बाब पेट्रोलिंग करताना पोलीस पथकाला आढळून आली. पाटागुडाप्रमाणे लोलडोहचाही टंचाई आराखड्यात समावेश नव्हता. त्यामुळे पाणीटंचाई नियंत्रणात आणण्याकरिता जिवतीच्या गटविकास अधिकाऱ्याने २९ एप्रिल रोजी लोलडोहचा प्रस्ताव पाठविला. या दोन्ही गावांसाठी खासगी विहिरी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाटागुडाला मिळाली बोअरवेल
नक्षलग्रस्त भाग असल्याने पोलिसांनी २६ एप्रिल रोजी जिवती तालुक्यात पेट्रोलिंग केली. त्यावेळी पाटणपासून १५ किलोमीटर अंतरावरील पाटागुहा येथे रणरणत्या उन्हात महिला डोक्यावर पाणी भरलेल्या घागरी आणत असल्याचे आढळून आले. हे गाव भाईपठारपासून दीड किलोमीटर आत जंगलामध्ये असून तेथे केवळ २० घरांची लोकवस्ती आहे. तेथे पोलिसांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. या अभियानातील प्रभारी पोलीस उपनिरीक्षक धमेंद्र मडावी यांनी गावातील पाणी समस्या जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांच्यापुढे मांडली. दिवान यांनी लगेच तेथे बोअरवेल करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर व पीएसआय मडावी यांनी दोन दिवसांत गावात बोअरवेल खोदून दिली.

Web Title: Four kilometers of footpath for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.