जाळ्यात अडकून चार कमलपक्ष्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:20 PM2018-12-16T22:20:48+5:302018-12-16T22:21:09+5:30
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जुनोना तलावात पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे गंभीर चित्र जुनोना तलावामध्ये सध्या दिसत आहे. स्तलांतरित पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या जुनोनाची ओळख आहे. या तलावात आता शिंगाळ्याची वेल लावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जुनोना तलावात पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे गंभीर चित्र जुनोना तलावामध्ये सध्या दिसत आहे. स्तलांतरित पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या जुनोनाची ओळख आहे. या तलावात आता शिंगाळ्याची वेल लावण्यात आली आहे. तलावाचा काही भाग हा वनविभाग व सिंचन विभागाचा आहे. शिंगाळ्याचे वेल वाचविण्यासाठी मासोळ्यांचे जाळे लावण्यात आले आहे, त्या जाळ्यात अडकून चार ‘ब्रॉन्झ विंग जकाना’ म्हणजेच सोनेरी पंखाचा कमलपक्षी (पाणमोर) यांचा मृत्यू झाला.
चंद्रपुरातील काही पक्षी मित्र रविवारी पक्षी निरीक्षणासाठी जुनोना तलाव परिसरात गेले असता दूरवर मासोळ्यांचे जाळे हे थोड्या थोड्या वेळाने हलताना दिसत होते. ते जवळ गेले असता एक कमलपक्षी जाळ्यात अडकलेला दिसला. त्याला वाचवण्यासाठी हॅबिटॅट कॉन्सर्व्हेशन सोसायटीचे शशांक मोहरकर, करण तोगट्टीवार पाण्यात उतरले. पाणी खोल असल्याने करण तोगट्टीवार यांनी पोहून जाण्याचा प्रयत्न केला. पण वेल व कचरा जास्त असल्याने ते अपयशी झाले. ते पाण्यात उतरल्यावर त्यांना जाळ्यात आणखी तीन कमलपक्षी अडकल्याचे दिसले. चारही पक्ष्यांचा यात मृत्यू झाला.