संपर्क तुटणाऱ्या १३ गावांमध्ये पोहोचले चार महिन्यांचे धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:14 PM2018-06-26T23:14:37+5:302018-06-26T23:14:59+5:30
दरवर्षी पावसाळ्यात रस्ते व पूर परिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. अशास्थितीत त्या गावांमध्ये धान्य पोहचविणे शक्य नसते. परिणामी नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागते.
मंगेश भांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दरवर्षी पावसाळ्यात रस्ते व पूर परिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. अशास्थितीत त्या गावांमध्ये धान्य पोहचविणे शक्य नसते. परिणामी नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागते. याची दखल घेत जिल्हा पुरवठा विभागाने पावसाळ्याच्या तोंडावर संपर्क तुटणाऱ्या १३ गावांमध्ये एकाचवेळी चार महिन्याचे धान पोहोचविले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थिती किंवा रस्ते वाहून गेले तरी नागरिकांना गावातच धान्य मिळणार आहे.
संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क दरवर्षी तुटत असते. तर काही गावांत जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने मुसळधार पावसात अस्तित्वातील रस्ताही दिसेनासा होते. अशा स्थितीत वाहनाने धान्य पोहचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे अशा गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पोहोचविले जाते. जिल्ह्यात अशी १५ गावे असून आतापर्यंत १३ गावांना एकाचवेळी चार महिन्यांचे धान्य पुरवठा करण्यात आले आहे.
संपर्क तुटणाºया गावांमध्ये चंद्रपूर तालुक्यातील वढा, आरवट, शिवणी चोर, पायली भटाळी, राजुरा तालुक्यातील कोलगाव, गोंडपिंपरी तालुक्यातील कुलथा, पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव, टोक, गंगापूर, ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, बल्लारपूर तालुक्यातील चारवट, हडस्ती व मूल तालुक्यातील कोरंबी या १३ गावांचा समावेश असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
तूर डाळीसाठी सक्ती करू नका
स्वस्त धान्य दुकानांमार्फत सध्या तूर डाळ वाटप केली जात आहे. याआधी ५५ रूपये किलो दराने डाळ विकली जात होती. परंतु, शासनाने नुकतीच तूर डाळीची किमंत कमी केली असून आता ३५ रूपये किलो दराने डाळ वाटप केली जात आहे. मात्र ग्रामीण भागात तूरीचे उत्पादन बºयापैकी होत असल्याने अनेक लाभार्थी तूर डाळ घेत नाही. अशावेळेस स्वस्त धान्य दुकानदार डाळ घेणार तरच गहू, तांदूळ मिळेल असे सांगत मागणी नसतानाही लाभार्थ्यांना तूर डाळ सक्तीने देत आहेत. मात्र तूर डाळीसाठी लाभार्थ्यांना दुकानदारांनी कुठलीही सक्ती करू नये, त्यांच्या मागणीनुसारच तूर डाळ द्यावी, मागणी नसेल तर देऊ नये, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय मिस्कीन यांनी म्हटले आहे.
१३ गावे ८ हजार ५३७ लाभार्थी
पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १३ गावांची लोकसंख्या ८ हजार ५३७ असून १९७७ शिधापत्रिकाधारक आहेत. यात ३५० एपीएल शिधापत्रिकाधारक, ६२७ अंत्योदय तर १ हजार प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना ९३९.९६ क्विंटल गहू तर ८४४.४७ क्विंटल तांदूळ असा १७८४.४३ क्विंटल धान्य पोहचविण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
पूर परिस्थितीमुळे व रस्त्यांच्या दुरवस्थेने जिल्ह्यातील १३ गावांत धान्य पोहचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे या गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पावसाळ्यापूर्वीच पोहचविले जाते. संपर्क तुटणाºया १३ गावांना धान्य पुरवठा करण्यात आला आहे.
- संजय मिस्कीन
जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर.