चार महिन्यातच तलावाच्या नहराला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:17 PM2018-05-19T23:17:09+5:302018-05-19T23:17:22+5:30
सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील मामा तलावाच्या कामाला चार महिने होत नाही, तोच तलावाचे पाणी सोडल्याने नहराला भगदाड पडले असून काम निकृष्ट झाल्याचा नमुनाच प्रत्यक्षात दिसत आहे. कामे निकृष्ट झाल्याची ओरड यापूर्वी शेतकऱ्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील मामा तलावाच्या कामाला चार महिने होत नाही, तोच तलावाचे पाणी सोडल्याने नहराला भगदाड पडले असून काम निकृष्ट झाल्याचा नमुनाच प्रत्यक्षात दिसत आहे. कामे निकृष्ट झाल्याची ओरड यापूर्वी शेतकऱ्यांनी केली. परंतु चंद्रपूर पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत आला. याचा परिणाम चार महिन्यातच नहराला भगदाड पडले आहे. त्यामुळे ऐन पाणी टंचाईत हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे.
वासेरा मामा तलावाचे बांधकाम गेल्या पाच महिन्यापासून सुरू आहे. त्यात नहराचे बांधकाम, मातीकाम, आऊटलेट (मोरी बांधकाम), तलावाची पाळ, वेस्टवेअरचे काम इत्यादी कामे केली जात आहेत. यात आतापर्यंत ७० लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
सदर मामा तलावाचे काम एका कंत्राटदारामार्फत सुरू आहे. चार महिन्यातच नहराचे काम, आऊटलेटचे काम, पाळीचे काम पूर्णत्वास आले आहे. सुरूंदाचे काम करण्याकरिता तलावातील पाणी नहराने सोडण्यात आले. नहराचे पाणी सोडताच मापनरला सुनील बोरकर यांच्या शेताजवळ मोठे भगदाड पडले आहे. यामुळे नहरातील पाणी शेतात वाहत आहे. सदर नहराचे काम चार महिन्यांपूर्वी करण्यात आले. परंतु मातीकाम बरोबर न केल्याने सदर नहराला मोठा भगदाड पडला. निकृष्ट कामाचेच हे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे आता बोलले जात आहे. पावसाळ्यात तर पाणी नहराने वाहत असते. पावसाळ्यात पूर्ण नहरच वाहून जाणार का, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. विशेष म्हणजे, नहराचे बांधकाम निकृष्ट होत असल्याची काम सुरू असताना नागरिकांनी केली. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्याचा परिपाक असा झाला की चार महिन्यातच नहर फुटला.
यापूर्वी ‘लोकमत’ने दोनदा वृत्त प्रकाशित करून कामाच्या निकृष्टतेकडे लक्ष वेधले होते. परंतु संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत होते. वासेरा येथील मामा तलावाच्या बांधकामाबद्दल सदर पाणीपुरवठा समिती वासेराने पाटबंधारे विभागाकडे तक्रार दाखल केली होती परंतु तक्रारीची साधी दखल विभागाने घेतली नाही.
सदर कामाची चौकशी वरिष्ठ अधिकाºयांनी करावी. त्यातच आऊटलेट संबंधात चुकीचे बांधकाम झाले आहे. त्याचीही चौकशी करावी. नहराचे जे काम शिल्लक आहे, तेही तातडीने करावे, अशी मागणी आहे.