आणखी चार मुलींची लैंगिक शोषणाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 05:15 AM2019-04-16T05:15:18+5:302019-04-16T05:15:23+5:30
इन्फंट जिजस सोसायटीच्या दोन मुलींवर लैंगिक शोषण झाल्याची बाब पुढे आल्यानंतर सोमवारी पुन्हा चार मुलींनी पोलीस ठाणे गाठून अशाच प्रकारची तक्रार नोंदविली.
राजुरा (चंद्रपूर) : येथील इन्फंट जिजस सोसायटीच्या दोन मुलींवर लैंगिक शोषण झाल्याची बाब पुढे आल्यानंतर सोमवारी पुन्हा चार मुलींनी पोलीस ठाणे गाठून अशाच प्रकारची तक्रार नोंदविली. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी आधीच छबन पचारे याला अटक केली आहे. आज सहाय्यक अधीक्षक नरेंद्र लक्ष्मण विरुटकर याला अटक केली. तसेच वसतिगृह अधिक्षिकेसह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
इन्फंट जिजस सोसायटीच्यावतीने राजुरा येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह आठ-दहा वर्षांपासून सुरू आहे. येथील दोन मुलींना पोटात दुखत असल्याच्या कारणावरून ६ एप्रिलला ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीअंती त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब १३ एप्रिल रोजी उजेडात आली.
पोलिसांनी कलम ३७६ (अ,ब) व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन पचारे या कर्मचाऱ्याला अटक केली. त्याला सवेतूनही निलंबित केले आहे. आता आणखी चार मुलींनी तक्रार दिल्याने प्रकरण गंभीर झाले आहे.
>ओआरएसमधून देत होते गुंगीचे औषध?
शालेय मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण नेमके काय आहे. याबाबत अद्यापही पोलिसांनी खुलासा केलेला नाही. परंतु सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचे जेवण झाल्यानंतर मुलींना ओआरएसची पावडर दिली जात होती. त्या पावडरमध्येच गुंगीच्या गोळ्या टाकून दिल्या जात असल्याचा तपासातून पुढे आले आहे.
>कडक कारवाई करा - पालकमंत्री मुनगंटीवार
या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी व अहवाल तातडीने कळविण्यात यावा, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे कळविले आहे.