ताडोबा बफर झोनमध्ये सुरू होणार पर्यटकांसाठी चार नवे प्रवेशद्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 03:31 PM2018-12-10T15:31:00+5:302018-12-10T15:32:30+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटकांची सातत्याने गर्दी वाढत आहे. यावर पर्याय म्हणून ताडोबा बफर झोनमध्ये झरी, पांगडी, मामला व रामदेगी येथे नव्याने चार प्रवेशद्वार लवकरच खुले करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटकांची सातत्याने गर्दी वाढत आहे. मात्र, सद्यस्थितीत केवळ सात प्रवेशद्वार सुरू असल्याने शेकडो पर्यटकांना पर्यटनाची संधी मिळत नाही. सतत हाऊसफुल्ल गर्दीमुळे निराश होऊन परतावे लागते. यावर पर्याय म्हणून ताडोबा बफर झोनमध्ये झरी, पांगडी, मामला व रामदेगी येथे नव्याने चार प्रवेशद्वार लवकरच खुले करण्यात येणार आहेत.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १ आॅक्टोबरपासून पर्यटकांची गर्दी वाढत आहे. दसरा व दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल्ल होता. येत्या काही दिवसांत ख्रिसमसच्या सुट्या लागणार आहेत. या कालावधीत बुकिंग फुल्ल होते. देशविदेशातील पर्यटकांमुळे कोअर झोनमध्ये पर्यटकांची सतत अधिक गर्दी वाढत आहे. सध्या या प्रकल्पातील सहा प्रवेशद्वारातून पर्यटक येत असल्याने दिवसभरात सुमारे ११९ वाहनांचे बुकिंग होते. यामुळे अनेक पर्यटकांना निराश होऊन परत जावे लागते तर काहींना ताडोबा बफर झोनमध्ये जंगल सफारी करावी लागते. आता तर बफर झोनही हाऊ सफुल्ल राहत आहे. ताडोबा बफर झोनमध्ये आगरझरी, देवाडा अडेगाव, जुनोना, कोलारा, नवेगाव, अलीझंझा व मदनापूर- कोलारा हे सात प्रवेशद्वार सुरू आहेत. या प्रवेशद्वारांमधूनही प्रचंड गर्दी होते. परिणामी, व्याघ्र दर्शनाऐवजी केवळ जंगल सफारीवरच समाधान मानावे लागत आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना अडचणी येऊ नयेत. गर्दीमुळे परत जाण्याच्या घटना घडू नये, या हेतूने झरी, पांगडी, मामला व रामदेगी हे चार प्रवेशद्वार लवकरच उघडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बफर झोनमधील प्रवेशद्वारांची संख्या ११ होईल.
-गजेंद्र नरवने, उपवनसंरक्षक ताडोबा (बफर)