ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावलीतील चार वाघ जाणार नवेगावबांधला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 08:10 PM2021-09-23T20:10:19+5:302021-09-23T20:10:51+5:30

Chandrapur News सिंदेवाही, ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील ११७ पैकी दीड ते दोन वर्ष वयाच्या चार वाघांना नवेगाव बांधमध्ये स्थलांतरित करण्यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण विषयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

Four tigers from Brahmapuri, Sindevahi and Savali will go to Navegaon | ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावलीतील चार वाघ जाणार नवेगावबांधला

ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावलीतील चार वाघ जाणार नवेगावबांधला

Next
ठळक मुद्देचंद्रपूर जिल्ह्यातील वाघांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण निर्णय

 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष पेटत आहे. यावर काही उपाय सुचवत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केवळ वाघांच्या विषयावर मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. या आधारे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावून वाघांबाबत सर्वकष आढावा घेतला.

(Four tigers from Brahmapuri, Sindevahi and Savali will go to Navegaon)

यामध्ये सिंदेवाही, ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील ११७ पैकी दीड ते दोन वर्ष वयाच्या चार वाघांना नवेगाव बांधमध्ये स्थलांतरित करण्यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण विषयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. ताडोबा लगतच्या कोळसा व ऊर्जानगर परिसरात वाघांची संख्या वाढतीवर आहे. या अनुषंगाने चार झोन नव्याने तयार करण्याबाबत सादरीकरण झाले. या अनुषंगाने डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला. तसेच निधीच्या कमतरतेकडे ना. वडेट्टीवारांनी लक्ष वेधताच या योजनेसाठी ५० कोटींवरून १०० कोटींची तरतूद करून १२० गावांना या योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी झाला.

यामध्ये सोलर कुंपणासाठी १०० टक्के अनुदान देण्याचे ठरविण्यात आले. जंगलालगत शेती असल्यामुळे शेतकरी मशागत करीत नाही. अशा शेतकऱ्यांना १० हजार रुपये भरपाईची मागणी ना. वडेट्टीवारांनी केली असता नेमकी किती गावे आणि शेती अशी आहे. याचा बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या.

पर्यटनवाढीच्या दृष्टीने इको-टुरीझमसाठी अडीच कोटींची गरज असल्याची बाब पुढे आली. सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार, भद्रावती तालुक्यातील चोरा, चिमूर तालुक्यातील खडसंगी, बल्लारपूर तालुक्यातील कोरवा व राजुरा तालुक्यातील जोगापूर येथे प्रायोगिक तत्वावर पहिला प्रयोग करण्याचा निर्णय यावेळी झाला. कोळसा, रानतळोधी व कारवा गावांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांनी मागितला आहे.

जंगलात १०० खोद तळे व सोलर हातपंपांना तत्त्वता मान्यता प्रदान केली आहे. यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयावर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वाईल्ड लाईफचे प्रधान वनसंरक्षक आनंद लिमये, चंद्रपूरचे मुख्यवन संरक्षक एन. आर. प्रवीण, ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, व्हिडिओ कान्फरन्सिगद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्राधिकारी उपस्थित होते.

 

वडेट्टीवारांचे पत्र आणि मुख्यमंत्र्यांची बैठक

चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या वाघांच्या हल्ल्याबाबत उपाययोजना करणे नितांत गरजेचे आहे. या अनुषंगाने उपाययोजनांसह विविध महत्त्वपूर्ण मागण्या असलेले पत्र जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. या पत्राचे गांभीर्य विचारात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या विषयावर ही बैठक बोलाविली होती.

Web Title: Four tigers from Brahmapuri, Sindevahi and Savali will go to Navegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ