अज्ञात वाहनाच्या धडकेत चंद्रपूर जिल्ह्यात चार रानटी डुक्कर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:07 PM2018-03-21T13:07:31+5:302018-03-21T13:09:29+5:30
जिल्ह्यातील तोहोगाव-कोठारी या मार्गावर बुधवारी पहाटे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चार रानटी डुक्कर जागीच झाल्याची घटना येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यातील तोहोगाव-कोठारी या मार्गावर बुधवारी पहाटे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चार रानटी डुक्कर जागीच झाल्याची घटना येथे घडली.
हा जिल्हा मार्ग एका बाजूने जंगलाने वेढलेला आहे तर त्याच्या दुसऱ्या बाजूला शेते आहेत. त्यामुळे या मार्गावर नेहमीच जंगली श्वापदांचा वावर असतो. यात वाघ, बिबट, नीलगाय, जंगली डुक्कर, चितळ आदींचा समावेश असतो. ही जंगली श्वापदे रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी वा शिकारीसाठी बाहेर पडतात तेव्हा ती रस्त्यावर येतात. अचानक समोर आलेले श्वापद पाहून वाहनचालक गांगरून जातो आणि तो अधिक जोरात वाहन पुढे दामटतो. अशाच या मुक्या जनावरांचा मात्र बळी जातो. या मार्गावर अशा अनेक घटना याआधीही घडल्या आहेत.
आंध्र व तेलंगणातून छत्तीसगडकडे जाण्यासाठी हा मार्ग ट्रकचालक निवडतात. याचे कारण असे की, त्यांना सीमाशुल्क वाचवायचे असते. त्यामुळेही या मार्गावर नेहमीच जड वाहनांची वाहतूक असते. अशातच असे मोठे अपघात होतात. ही परिस्थिती पाहता येथे कधी जिवीतहानीही घडू शकते अशी शक्यता येथील गावकरी व्यक्त करीत आहेत. वन्यविभाग व अन्य प्रशासकीय विभागांनी याची दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.