चौथ्यांदा चॅम्पियनशिपवर मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:37 PM2018-10-05T22:37:16+5:302018-10-05T22:37:39+5:30
कायदा व सुव्यवस्थेचे दैनंदिन आव्हानात्मक कर्तव्य बजाविताना क्रीडा स्पर्धेतही चंद्रपूर पोलीस दलाने सातत्य राखले. सलग चौथ्यांदा चॅम्पियनशिपवर विजयाची मोहर लावली. सन २०१५ मध्ये गोंदिया, २०१६ ला चंद्रपूर, २०१७ ला नागपूर आणि २०१८ मध्ये वर्धा येथे पार पडलेल्या. नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये अव्वल कामगीरी करून जिल्ह्याचे नाव उंचावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कायदा व सुव्यवस्थेचे दैनंदिन आव्हानात्मक कर्तव्य बजाविताना क्रीडा स्पर्धेतही चंद्रपूर पोलीस दलाने सातत्य राखले. सलग चौथ्यांदा चॅम्पियनशिपवर विजयाची मोहर लावली. सन २०१५ मध्ये गोंदिया, २०१६ ला चंद्रपूर, २०१७ ला नागपूर आणि २०१८ मध्ये वर्धा येथे पार पडलेल्या. नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये अव्वल कामगीरी करून जिल्ह्याचे नाव उंचावले.
नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१८ चे यजमानपद यंदा वर्धा जिल्हा पोलीस दलाकडे होते. २७ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर २०१८ दरम्यान ही स्पर्धा झाली. स्पर्धेमध्ये नागपूर परिक्षेत्रातील नागपूर ग्रामीण, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश होता. सहाही जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस खेळाडू मिळून एक हजार खेळाडूंची उपस्थिती होती. स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, बॉस्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, हँडबॉल, वेट लिफ्टींग, कुस्ती, ज्युडो, बॉक्सींग, स्विमींग, मॅराथॉन, क्रॉस कंट्री व कबड्डी आदी क्रीडा प्रकारांचा समावेश होता. नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर पोलीस दलाने जनरल चॅम्पियनशिप पटकावित अव्वल स्थान पटकाविले. फुटबॉल द्वितीय, हॉकी प्रथम, स्विमींग प्रथम, वेटलिफ्टींग प्रथम, बॉक्सींग प्रथम, कुस्ती प्रथम, ज्युडो द्वितीय, हॉलीबॉल तृतीय, कबड्डी प्रथम, बास्केटबॉल प्रथम, हँडबॉल तृतीय, खो-खो चतुर्थ, क्रॉस कंट्री प्रथम, अॅथलेटीक्स द्वितीय असे विजयाचे स्वरूप होते. एकूण १८७ गुणांची कमाई करून सलग चौथ्यांदा जनरल चॅम्पियनशिप मिळविण्यात जवानांना यश आले. बुधवारी परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारोप समारंभ पार पडला.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे व अन्य अधिकारी उपस्थित होते. सरावामुळे हे यश मिळाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.