विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:40+5:302021-06-18T04:20:40+5:30
वनविभागा व पर्यावरण वादीचे दुर्लक्ष चिमूर : अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत आलेला कोल्हा परिसरातील कुत्रे मागे धावल्याने वेगाने ...
वनविभागा व पर्यावरण वादीचे दुर्लक्ष
चिमूर : अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत आलेला कोल्हा परिसरातील कुत्रे मागे धावल्याने वेगाने पळत सुटला. या धावपळीत तो वडाळा पैकू येथील मूकबधिर विद्यालयाजवळील कोरड्या विहिरीत पडला. याची माहिती स्थानिक पर्यावरणप्रेमींना देण्यात आली. ते पाहूनही गेले. मात्र तीन दिवसांपर्यंत मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोल्ह्याचा अन्न व पाण्याविना बुधवारी मृत्यू झाला.
आठ दिवसांपूर्वी एक कोल्हा अन्नाच्या शोधात निघाला असताना परिसरातील कुत्रे त्याच्या मागे धावले. जीव वाचविण्याच्या बेताने सुसाट वेगाने धावता धावता कोल्हा मूकबधिर विद्यालयाजवळील एका कोरड्या विहिरीत पडला. विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी यांनी याची माहिती एका पर्यावरण प्रेमीला दिली. ते व वनविभागाचे कर्मचारी विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला पाहूनही गेले. मात्र तीन दिवसांपर्यंत कुणीच तिथे आले नाही. अनेकांनी कोल्ह्यासाठी भाकरी व खाद्यपदार्थ टाकले. ते त्याने खाल्लेही. मात्र विहिरीत पाणीच नसल्याने ते वाचू शकले नाही. बुधवारी रात्री राउंड ऑफिसर नरड यांनी घटनास्थळाला भेट दिली, तेव्हा सदर कोल्हा विहिरीतच मृतावस्थेत आढळला.