जिल्ह्यातील जनतेला २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:18 AM2017-08-10T01:18:08+5:302017-08-10T01:18:36+5:30
वस्तू जिथे तयार होते ती तिथे स्वस्त मिळते. असे असताना चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ५५०० मे.वॅ. वीज निर्मिती होत असतानाही येथील जनतेला भरमसाठ वीज बिल भरावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वस्तू जिथे तयार होते ती तिथे स्वस्त मिळते. असे असताना चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ५५०० मे.वॅ. वीज निर्मिती होत असतानाही येथील जनतेला भरमसाठ वीज बिल भरावे लागते. जिल्ह्यात सहा वीज कंपन्यांमध्ये दररोज एक लाख टनपेक्षा अधिक कोळसा जळतो. यामुळे भयंकर प्रदूषणाचा सामना करावा लागतो. एकतर चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्या अन्यथा वीज निर्मिती केंद्र बंद करा, असा खणखणीत इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर जोरगेवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
चंद्रपूर जिल्हा वनसंपत्तीने नटलेला आहे. येथे खजिन व पाण्यासाठी इरई नदी अस्तित्वात आहे. पाणी आणि कोळशाच्या मुबलकतेमुळे आशिया खंडातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणारे सीटीपीएस केंद्र सुरू आहे. हा प्रकल्प ६० एकरात व्यापला आहे. महाराष्ट्राला लागणाºया २५ टक्के विजेचे उत्पादन करणाºया चंद्रपूर जिल्ह्याला प्रदूषणाची झळ सोसावी लागत आहे. तसेच सरकार येथील जनतेला महागडी वीज देते.
यामध्ये सामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे. आणि दुसरीकडे मुंबईत मात्र हीच वीज स्वस्तात उपलब्ध करून दिली जाते. हा ंचद्रपूर जिल्ह्यातील जनतेवर अन्याय आहे. यापुढे हा अन्याय येथील जनता सहन करणार नाही, जनतेला किमान २०० युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी. त्यानंतरच्या युनिटला उत्पादन खर्चाएवढे बील आकारावे, यासाठी लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येणार आहे, अशी माहितीही जोरगेवार यांनी दिली.
प्रति युनिट वीज उत्पादन खर्च २.५० रुपये इतका आहे. मात्र हीच वीज वीज कंपनीला ४ ते १४ रुपये प्रतियुनिट प्रमाणे जनतेसाठी विकत घ्यावी लागत आहे. सीटीपीएस हा प्रकल्प ६० एकरात व्यापला आहे. या जागेत तज्ज्ञांच्या माहितीनुसार सौर ऊर्जेची निर्मिती करून सुद्धा वीज उत्पादन केल्या जाऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आंदोलनाचाच एक भाग म्हणून प्रदूषणाची विदारक स्थिती दर्शविणारी माहिती असलेल्या २५ हजार पुस्तिका प्रकाशित करून जनतेला त्याचे वितरण केले जाणार आहे. सोबतच पाच लाख लोकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री व पंतप्रधानांसा सोपविले जाणार असल्याचेही जोरगेवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक दापके व अन्य मंडळी उपस्थित होती.
महागड्या विजेमुळे
८० टक्के उद्योग ठप्प
वीज महागात पडत असल्यामुळे जिल्ह्यातील ८० टक्के उद्योग ठप्प पडलेले आहे. नवीन उद्योग शेजारच्या राज्यात गेल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. परिणामी स्थानिक बेरोजगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.