मुलींसाठी मोफत बस योजना ठरत आहे कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:32 AM2021-09-24T04:32:17+5:302021-09-24T04:32:17+5:30
ग्रामीण भागात मुलींसाठी शिक्षणाची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून शासनाने मोफत बस सुविधा आणली. प्रत्यक्ष मुलींना संधी मिळाली. जाण्या-येण्याची ...
ग्रामीण भागात मुलींसाठी शिक्षणाची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून शासनाने मोफत बस सुविधा आणली. प्रत्यक्ष मुलींना संधी मिळाली. जाण्या-येण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने मुलींची संख्यासुद्धा शाळा व महाविद्यालयांमध्ये वाढली. त्यांचे चांगले परिणामही दिसू लागले. परंतु, कोरोना काळानंतर परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. मुलींना ताटकळत एक दोन नव्हे तर चक्क तीन-तीन तास बसची वाट बघावी लागते. कोरोना स्थितीमुळे शाळांचे अंशतः बदललेले वेळापत्रक व तालुक्यातील मुख्य बसस्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये तारतम्य दिसत नाही. मुख्य बसस्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या दोन-दोन वेळा वेळापत्रकानुसार रद्द कराव्या लागतात, हे दुर्दैवी आहे. याविषयी चौकशी केली असता, जिल्हा स्तरावरून जेवढ्या गाड्या पाहिजेत, त्या सुटत नसल्याचे सांगण्यात येते. याशिवायही अनेक कारणे सांगितली जातात. यामध्ये इंधनाचासुद्धा समावेश आहे. मारोडा येथे जवळपास ७४ मुलींना पासेस देण्यात आले. परंतु, परतीच्या प्रवासाला बसेस नाहीत. यावेळी १५० ऐवजी केवळ ६० गाड्या जेमतेम उपलब्ध होतात, असे सांगण्यात येते. मुलींसाठी धावणाऱ्या बसेस वेळापत्रकानुसार अग्रक्रमाने सोडल्या जाव्यात, अशी पालकांची मागणी आहे.