दुर्गापूर कोळसा खाणीतील रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 05:00 AM2021-12-12T05:00:00+5:302021-12-12T05:00:51+5:30
दुर्गापूर कोळसा खाण परिसरात बिबट्यांचा वावर आहे. या परिसरात बिबट्याने पाच ते सात लोकांचा बळीही घेतला आहे. अजूनही येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना ठीकठिकाणी बिबट्यांचे दर्शन होत आहे. मात्र, काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चक्क एक भलामोठा पट्टेदार वाघ खाणीच्या रस्त्यानेच मार्गक्रमण करीत होता. कर्तव्यावर असलेले एक अधिकारी खाणीतून परत येत असताना त्यांच्या चारचाकी वाहनापुढे हा वाघ तब्बल दोन किलोमीटर रस्त्याने पुढे चालला.
अजिंक्य वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : ताडोबात एखादा पट्टेदार वाघ मुक्त संचार करीत असताना आढळून यावा, असाच एक वाघ शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान दुर्गापूर सेक्टर -५ या कोळसा खाणीतील रस्त्यावर एका अधिकाऱ्याच्या वाहना पुढे तब्बल दोन किलोमीटर रस्त्याने चालताना आढळून आला. त्यामुळे खाणीत सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
दुर्गापूर कोळसा खाण परिसरात बिबट्यांचा वावर आहे. या परिसरात बिबट्याने पाच ते सात लोकांचा बळीही घेतला आहे. अजूनही येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना ठीकठिकाणी बिबट्यांचे दर्शन होत आहे. मात्र, काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चक्क एक भलामोठा पट्टेदार वाघ खाणीच्या रस्त्यानेच मार्गक्रमण करीत होता. कर्तव्यावर असलेले एक अधिकारी खाणीतून परत येत असताना त्यांच्या चारचाकी वाहनापुढे हा वाघ तब्बल दोन किलोमीटर रस्त्याने पुढे चालला. पाऊण तासानंतर तो खाणीलगतच्या जंगलात शिरला. ताडोबात न जाता कर्तव्यावर असतानाच अधिकाऱ्याला पट्टेदार वाघाच्या मुक्तसंचाराचा मनसोक्तपणे मनमुराद आनंद लुटायला तर मिळाला. मात्र, सायंकाळच्या वेळेस सर्वत्र शुकशुकाट असलेल्या निर्जन रस्त्यावरील हे वाघाचे दृश्य नक्कीच धडकी भरविणारे होते. येथील बिबट्यासह पट्टेदार वाघांचे वाढते वास्तव्य कर्तव्यावर ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यास अतिशय धोक्याचे आहे.