भाजपाच्या सत्तेचा मार्ग मोकळा
By Admin | Published: April 22, 2017 01:04 AM2017-04-22T01:04:01+5:302017-04-22T01:04:01+5:30
प्रभाग क्रमांक ६ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये तर बहुजन समाज पार्टीने चमत्कार घडविला.
चंद्रपूर : प्रभाग क्रमांक ६ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये तर बहुजन समाज पार्टीने चमत्कार घडविला. या प्रभागातील चारही जागांवर बहुजन समाज पार्टीने विजय मिळवित संपूर्ण प्रभागावरच कब्जा केला आहे. विजयी उमेदवारात प्रदीप डे, राजलक्ष्मी कारंगल, रंजना यादव व धनराज सावरकर यांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक ७ जटपुरा प्रभागात शिवसेना व राकाँची सत्ता संपुष्टात आणत भाजपाने चार जागा काबीज केल्या. अभ्यासू नगरसेवक समजल्या जाणाऱ्या राकॉंच्या संजय वैद्य यांना पराभव पत्कारावा लागला. येथून भाजपाचे राहूल घोटेकर, छबू वैरागडे, शितल आत्राम, रवी आसवानी हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक ८ वडगावमध्ये कोणत्याही एका पक्षाला वर्चस्व सिध्द करता आले नाही. येथून भाजपाचे विद्यमान नगरसेवक देवानंद वाढई, काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सुनिता लोढिया, भाजपाचे विद्यमान महापौर राखी कंचर्लावार व प्रहारचे पप्पू देशमुख हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक ९ नगिनाबागमध्ये सर्व चारही जागांवर विजय मिळवित भाजपाने आपले वर्चस्व सिध्द केले. भाजपाचे सविता कांबळे, राहुल पावडे, वंदना तिखे व प्रशांत चौधरी हे निवडून आले. प्रभाग क्रमांक १० एकोरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या प्रभागात अशोक नागापुरे, विना खनके, सकिना अंसारी यांच्या रुपात कॉग्रेसने तीन जागा मिळविल्या. एका जागेवर राकाँचे दीपक जयस्वाल निवडून आले.
प्रभाग क्रमांक ११ भानापेठमध्ये संपूर्ण जागांवर भाजपाने बाजी मारली. येथून भाजपाचे शितल कुळमेथे, राजेंद्र अडपेवार, आशा आबोजवार व विद्यमान महापौर राखी कंचर्लावार यांचे पती संजय कंचर्लावार हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक १२ महाकालीमध्ये भाजपाच्या अनुराधा हजारे यांच्या रुपातील एक जागा सोडली तर इतर जागांवर काँग्रेसचे आपले वर्चस्व सिध्द केले. काँग्रेसचे नंदू नागरकर, विद्यमान सभापती संतोष लहामगे यांच्या पत्नी कल्पना लहामगे व निलेश खोब्रागडे हे विजयी झाले. काँग्रेसचे नंदू नागरकर आणि काँग्रेसमधून ऐनवेळी भाजपात गेलेले रामू तिवारी यांच्यात थेट लढत असल्यामुळे या प्रभागाकडे सर्वाचे लक्ष लागून होते. अखेर रामू तिवारी यांना पराभव पत्करावा लागला. प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठमध्ये पुन्हा बहुजन समाज पार्टीने आपले वजन दाखविले. येथून बहुजन समाज पार्टीच्या पुष्पा मून आणि पितांबर कश्यप विजयी झाले. इतर दोन जागांवर काँग्रेसच्या ललिता रेवेल्लीवार व अपक्ष स्नेहल रामटेके यांनी विजय मिळविला. 0प्रभाग क्रमांक १४ भिवापूरमध्ये भाजपाने तीन जागा मिळविल्या. भाजपाचे विद्यमान उपमहापौर वसंत देशमुख, सतीश धोनमोडे, खुशबू चौधरी आणि राष्ट्रवादीच्या मंगला आकरे या विजयी झाल्या.
प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिरमध्ये कोणत्याही पक्षाला वर्चस्व सिध्द करता आले नाही. येथे शिवसेनेचे विशाल निंबाळकर, भाजपाच्या संगिता खांडेकर, काँग्रेसचे प्रशांत दानव व मनसेच्या सीमा रामेडवार यांनी विजय मिळविला. प्रशांत दानव यांनी भाजपाचे श्रीहरी बनकर यांचा २५८७ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १६ हिंदूस्थान लालपेठमध्ये भाजपाने वर्चस्व सिध्द केले.
भाजपाचे स्वामी कनकम, ज्योती गेडाम आणि कल्पना बगुलकर हे विजयी झाले. प्रभाग क्रमांक १७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाात बहुजन समाज पार्टीचे अनिल रामटेके आणि बंटी परचाके यांनी विजय मिळविला तर तिसऱ्या जागेवर अपक्ष निलम आक्केवार यांची वर्णी लागली.
विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना - सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांच्या परिश्रमालाच असून मतदारांनी शहराच्या विकासासाठी आपल्या पक्षाला मतदान केल्याची नम्र जाणीव आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.मतदानात मिळालेल्या कौलासंदर्भात ते म्हणाले, हा विजय आपण नम्रतेने स्विकारात आहोत. यापुढील काळात हे शहर राज्यातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प आपण करीत आहोत. चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक भाजपाने विकासाच्या मुद्यावर लढविली. मतदारांसमोर आम्ही केलेली विकासकामे ठेवून निवडणूक लढविली. नागरिकांनी मतरूपी आशिर्वाद देत विकासाच्या बाजूने कौल दिला. मतदारांच्या प्रेमाला आणि विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असेही वित्तमंत्र्यांनी म्हटले आहे.
लोकशाहीचा गळा कापायचा असेल
तर इव्हीएमकडून शिका - नरेश पुगलिया
चंद्रपूर : मनपा निवडणुकीत मतदारांकडून मिळालेल्या कौलावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी इव्हीएम मशिनबद्दल तिखट प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय लोकशाहीचा गळा कापायचा असेल तर, इव्हीएम मशीनकडून शिका, असे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात ते म्हणाले, यंत्रामध्ये घोळ होणार याची कल्पना असल्याने आपल्या पक्षाने निवडणुकीचा कार्यक्रम लागण्यापूर्वीच मतपत्रिकेवरून मतदान घेण्याची विनंती केली होती. एवढेच नाही तर, इव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपीटी जोडण्याची विनंतीही केली होती. मात्र या मागणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. एवढेच नाही तर, मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँग रूमला सील न केल्याचा मुद्दाही मतदानाच्या रात्रीच आयुक्तांच्या निदर्शनास आणला होता. मात्र सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे मतदारांच्या भावनांचा खून झाला आहे. ही महानगर पालिकेची निवडणूक मतदारांची नसून इव्हीएम मशीनची आहे. मात्र हे गैरकृत्य लोकशाहीला घातक असून लोकशाहीची विटंबना असल्याची खरमरित प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या संदर्भात कायदेशीर सल्ला घेवून लवकरच न्यायालयात दाद मागू, असेही त्यांनी म्हटले आहे.