तलाठी खातेदाराच्या घरी जाऊन देणार मोफत सातबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:34+5:302021-09-13T04:26:34+5:30
बल्लारपूर : येणाऱ्या महात्मा गांधी जयंतीपासून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना तलाठीमार्फत सातबारा देण्याचा उपक्रम महसूल व ...
बल्लारपूर : येणाऱ्या महात्मा गांधी जयंतीपासून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना तलाठीमार्फत सातबारा देण्याचा उपक्रम महसूल व वनविभागातर्फे हाती घेण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष २०२१-२०२२ येणाऱ्या या विशेष मोहिमेअंतर्गत सातबारा उताऱ्याचे अद्ययावत प्रत एका खातेदारास फक्त एकदाच मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून, देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये आजपर्यंत शेती क्षेत्राचा मोठा वाटा राहिलेला आहे. तसेच महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेतून म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्य यामध्ये शेती ही सर्व विकासाची आधारशिला होती. उक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये महसूल लेखांकन पद्धती विषयक गा.न.न.७/१२ अधिकार अभिलेख पत्रक अद्ययावत करण्यात आले आहे. हा उतारा सर्व संबंधितांना समजण्यासाठी अधिक सोपा करण्यात आलेला आहे. चालू वर्ष हे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
बॉक्स
आर्थिक उभारणीत शेतकऱ्यांचे योगदान विचारात घेऊन निर्णय
या पार्श्वभूमीवर राज्याच्या आर्थिक उभारणीतील शेतकऱ्यांचे योगदान विचारात घेऊन २ ऑक्टोबर २०२१ या महात्मा गांधी यांच्या जयंती दिनांकापासून डिजिटल भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या सातबारा उताऱ्याच्या प्रति गावांमध्ये संबंधित तलाठ्यांमार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ती गांधी जयंतीपासून राबविण्यात येत आहे. बल्लारपूर तालुक्यातील ३३ गावांत सात हजारांच्या वर शेतकरी बांधव असून, त्यांना या मोहिमेचा फायदा मिळणार आहे.