मोकळ्या जागा शरीर स्वास्थ्याचे केंद्र व्हाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:09 AM2018-01-26T00:09:45+5:302018-01-26T00:10:51+5:30
प्रदूषणाच्या समस्येशी आम्ही लढत असताना शहरातील मोक्याच्या जागा अतिक्रमणाच्या घशात न जाता या ठिकाणी पर्यावरणपूरक बाबींना वाव मिळायला हवा. शहरातील मोकळ्या जागा विचारमंथन व शरीर स्वास्थ्याचे केंद्र झाल्या पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रदूषणाच्या समस्येशी आम्ही लढत असताना शहरातील मोक्याच्या जागा अतिक्रमणाच्या घशात न जाता या ठिकाणी पर्यावरणपूरक बाबींना वाव मिळायला हवा. शहरातील मोकळ्या जागा विचारमंथन व शरीर स्वास्थ्याचे केंद्र झाल्या पाहिजे. शरीराला व मनाला आयाम देणाºया पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण करण्याची इच्छा होती. ती पूर्णत्वास जात असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचेपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर शहरातील आनंदनगर सोसायटीमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान, भावना सोसायटीमध्ये महात्मा बसवेश्वर उद्यान, शंकरनगर सोसायटीमध्ये स्व. प्रमोद महाजन उद्यान, इंजिनिअर्स कॉलनीमध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान, लक्ष्मीनगर सोसायटीमध्ये राजमाता राणी हिराई उद्यानाचे लोकार्पण बुधवारी सायंकाळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे, सभागृह नेता वसंत देशमुख, झोन सभापती देवानंद वाढई आदी उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, एकाच दिवशी पाच मोकळया जागेच्या ठिकाणी देखण्या उद्यानाचे लोकार्पण करताना आनंद झाल्याचे सांगितले. महानगरपालिका हद्दीमधील मोकळया जागा हे अतिक्रमणाचे केंद्र बनतात. यातून या जागा पुढे घाणीचे साम्राज्य वाढवतात. चंद्रपूर शहरात अशा पध्दतीचे मोकळया जागांना बकाल स्वरुप येऊ नये, यासाठी वैशिष्टयपूर्ण योजना निधीतून शहरातील या मोकळया जागांना महापुरुषांच्या नावाने उद्यान उभारण्याचे कार्य आपण सुरु केले असून वेगवेगळया ठिकाणी चांगल्या स्वरुपात ही उद्यानं लोकांसाठी मोकळी झाल्याचा आनंद आहे. परिसरात राहणाºया दक्ष नागरिकांनी विशेषत: जेष्ठ नागरिक संघांनी या विकसित जागेच्या संरक्षणाची जबाबदारी स्वयंप्रेरणेने घ्यावी. महानगरपालिका आपले दायित्व पूर्ण करेलच. परंतु अशा सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाची व सुरक्षेची जबाबदारी घेणाºया लोकांमध्ये वाढ झाली पाहिजे. ही सुरक्षित स्थळे विचार मंथनाची आणि शरीराला स्वस्थता देणारी केंद्र झाली पाहिजे. शहरातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.