मोफत पाठ्यपुस्तकांची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात
By admin | Published: February 8, 2017 02:04 AM2017-02-08T02:04:58+5:302017-02-08T02:04:58+5:30
कोणत्याही घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. शाळामधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी,
शिक्षकांची लगबग : ‘झिरो बॅलन्स’वर उघडणार विद्यार्थ्यांची बँक खाती
चिमूर : कोणत्याही घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. शाळामधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी मागील काही वर्षांपासून इयत्ता पहली ते आठवीपर्यंतच्या सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यामातून मोफत पाठ्यपुस्तके दिली जात होती. परंतु यापुढे विद्यार्थ्यांना थेट पुस्तके देण्याऐवजी त्यांची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीयकृत बँकामध्ये ‘झीरो बॅलन्स’वर खाती उघडण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने १३ जानेवारीला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शासनाने काढलेल्या आदेशान्वये विविध कल्याणकारी योजनामध्ये वस्तू स्वरुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तातर रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले आहे. त्या खात्याला संबंधित लाभार्थ्यांचा आधार क्रमांक जोडण्यासही सांगितले आहे. त्यानुसार कल्याणकारी योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्याचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
सध्या राज्यातील सगळ्याच विद्यार्थ्यांची बँकेत खाती नाहीत. शासनाच्या कोणत्याही योजनाचा लाभ त्यांना देण्यापूर्वी त्यांचे खाते बँकेमध्ये असणे आवश्यक आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून यापुढे पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ डिसेंबरच्या शासन आदेशानुसार पाठ्यपुस्तकांसाठी लागणारी रक्कम थेट संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांची खाती बँकांमध्ये असणे आवश्यक आहे.
भविष्यात शासनाकडून मिळणाऱ्या पैशातून पालकांना पाल्यासाठी बाजारातून पुस्तके खरेदी करावे लागणार आहेत.
वास्तविक पाहता गेल्या काही वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच पुस्तके मिळत होती. परंतु आता नव्या आदेशानुसार पालकांना ही पुस्तके खरेदी करावी लागणार आहेत.
या पुस्तकांची किंमत बाजार भावाप्रमाणे राहणार आहे. पुस्तकासाठी शासन किती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)