जिल्हा परिषद परिसरात मोफत ‘वायफाय’
By admin | Published: January 7, 2017 12:47 AM2017-01-07T00:47:04+5:302017-01-07T00:47:04+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ च्या संकल्पनेला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्रर सिंह यांच्या पुढाकारातून....
सीईओंचा पुढाकार : नागरिकांनाही सेवा उपभोगता येणार
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ च्या संकल्पनेला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंद्रर सिंह यांच्या पुढाकारातून कर्मचारी आणि जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांसाठी फ्री इंटरनेट सेवा देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद परिसरात ‘वाय-फाय’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्या अॅन्ड्राईड मोबाईलधारकांना विनामूल्य या वायफाय सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
जिल्हा परिषदेत कार्यरत कर्मचारी आणि नागरिकांना ई- सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही सेवा फायद्याची ठरणार आहे. या सुविधेमुळे अॅन्ड्राईट मोबाईलधारकांना बँकिंग व्यवहार, ई- मेल, मॅसेज आदान- प्रदान करणे आदी सुविधा विनामूल्य मिळणार आहेत. सोबतच जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ, पंचायत राज सेवार्थ पोर्टल विना पासवर्ड पाहता येणार आहे. याद्वारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध सूचना, बातम्या व संकेतस्थळावरील इतर सूचना नागरिकांना पाहता येणार आहे.
जिल्हा परिषद परिसरात सुरू करण्यात आलेल्या या प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेतील सर्व विभाग आणि कर्मचाऱ्यांनाही जोडण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाकरिता या सुविधेचा लाभ घेण्यासाठी वेगळा ‘युजरनेम व पासवर्ड’ देण्यात आला असून त्याद्वारे ते कार्यालयीन कामकाजासाठी या सुविधोचा लाभ घेऊ शकणार आहेत. सलग दोन तासपर्यंत मोफत ही सुविधा मिळणार असून दोन तासानंतर पुन्हा नवा कोड देऊन या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. (प्रतिनिधी)
असा घेता येईल सेवेचा लाभ
जिल्हा परिषद परिसरात वायफाय मधून मोफत इंटरनेट सुविधा घेण्याकरिता अॅन्ड्राईड मोबाईलधारकांनी मोबाईलमधील वायफाय आॅप्शन सुरू करून जिल्हा परिषद चंद्रपूरला कनेक्ट करावे, त्यानंतर इंटरनेट ब्राऊजरमधून जि.प. वाय-फाय पोर्टलचे पेज ओपन होईल. त्यामधून ‘गेन पीनकोड बाय एसएमएस’ या आॅप्शनमधून युजरने स्वत:चा मोबाईल क्रमांक आणि सेक्युरिटी कोड टाकून सेंड केल्यावर त्या मोबाईलवर ‘झेडपी वायफाय’ द्वारे एसएमएस येईल. यातून पीन कोड प्राप्त झाल्यानंतर तो ‘प्रीपेड कोड’मध्ये टाकून ‘लॉग इन’ केल्यानंतर इंटरनेटचा वापर करता येईल.