स्वातंत्र्याने मोकळा श्वास दिला; विकास कुठे आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:21+5:302021-08-15T04:29:21+5:30
कोरोनाने हिरावले स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा अमृत महाेत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. हयात असलेल्या ...
कोरोनाने हिरावले स्वातंत्र्य
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा अमृत महाेत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. हयात असलेल्या फार कमी लोकांनी पारतंत्र्य काळातील इंग्रजांच्या गुलामगिरीचा काळ अनुभवला आहे. इंग्रजांनी अनेक निर्बंध लादले होते. यातून मुक्त झालो. विकासाचे स्वप्न घेऊन पुढे जाऊ लागलो. पण, खरोखरच सर्वांची प्रगती झाली का हा प्रश्न आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशांतर्गत निर्बंध आले. मोकळा श्वास घेण्याचे स्वातंत्र्य उरले नाही. शिक्षणाचेही तीनतेरा वाजले. मुलांचे प्रचंड नुकसान होत आहे.
-मनोहर स्वामी, वरोरा
पारतंत्र्याचा काळ खूप संघर्षाचा होता. आज जशा सोयीसुविधा आहेत तशा सुविधा पूर्वी नव्हत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली. पण, स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बेरोजगारी, गुन्हेगारी व कर्जबाजारीपणामुळे नागरिक त्रस्त आहेत.
-नामदेव देवाळकर, ज्येष्ठ नागरिक, गोवरी
महिला विविध क्षेत्रात प्रगती करीत आहेत. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. क्रीडा क्षेत्र तर युवतींच्या आवडीचे क्षेत्र झाले आहे. परंतु, आज महिला सुरक्षित नाहीत, याची खंत वाटते. महिलांवर वाढत जाणारे अत्याचार आज चिंतेची बाब आहे.
-गायत्री उरकुडे, अंतरगाव (बु.)
भारताने विविध क्षेत्रात प्रगती केली. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे नवे जग उभे झाले. यंदा ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाल्याने खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण झाले. परंतु, आतापर्यंतच्या वाटचालीत समस्याही निर्माण झाल्या. राजकीय नेतृत्व स्वार्थाच्या दावणीला बांधल्याने बेरोजगारीचे प्रश्न उग्र रूप धारण करीत आहेत. त्यावर उपायांची गरज आहे.
-प्रद्युत डोहणे, सावली
मुली शिक्षणात अग्रेसर आहेत. त्यांना स्वावलंबी होण्यासाठी शासनाने योग्य धोरण राबविले पाहिजे. पालकांची मानसिकता बदलत आहे. पण, गरीब कुटुुंबांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.
-वैशाली घोडमारे, बाबूपेठ, चंद्रपूर